निवडणूक प्रचारासाठी आता राहुल गांधीही गोव्यात येणार

पणजी : गोव्यात सध्या निवडणुकीची धामधूम सुरु आहे. या राज्यात मुख्य सामना भाजप आणि कॉंग्रेसमध्येच असल्याचे सध्या तरी दिसून येत आहे. यातच आता काँग्रेस नेते राहुल गांधी २ फेब्रुवारी रोजी पक्षाच्या निवडणूक प्रचारासाठी गोवा राज्याचा दौरा करणार आहेत आणि गोव्यातील लोकांशी संवाद साधणार आहेत. काँग्रेसच्या मीडिया प्रमुख अलका लांबा यांनी रविवारी पणजी येथे पत्रकार परिषद घेवून सांगितले की राहुल गांधी त्या दिवशी काँग्रेस आणि युती पक्ष गोवा फॉरवर्डच्या सर्व उमेदवारांशी देखील संवाद साधतील.

यावेळी गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, वरिष्ठ उपाध्यक्ष एम के शेख, विठू मोरजकर, हिमांशू तिवरेकर, समीर रायकर आदी उपस्थित होते. गोव्याला बदल हवा आहे, त्याबद्दल चर्चा करण्यासाठी ते पर्यटन उद्योगातील प्रतिनिधी, अंगणवाडी सेविका आणि इतर क्षेत्रातील प्रतिनिधींना भेटतील. संध्याकाळी ४ वाजता ते साखळी येथे सभेला संबोधित करतील.’’ असे अलका लांबा म्हणाल्या.

यावेळी राहुल गांधी काँग्रेसचा जाहीरनामाही प्रसिद्ध करणार आहेत. या सभेत गोव्यातील काँग्रेस समर्थक व्हरच्युअल माध्यमातून सहभाग घेणार असे त्या म्हणाल्या. ‘‘राहुल गांधी सर्व उमेदवारांना भेटतील आणि त्यांच्याशी संवाद साधतील. यावेळी उमेदवारांना ते मार्गदर्शन करतील असेही त्यांनी सांगितले.

यावेळी गिरीश चोडणकर म्हणाले की, गोवा अनेक समस्यांनी ग्रासलेला आहे. त्यामुळे लोकांनी योग्य पद्धतीने त्याचा सामना करण्याचे ठरवले आहे. आम्ही प्रचार करतो तेव्हा हे दिसून येते की गोव्यातील लोकांना बदल हवा आहे. त्यांनी भाजपला घरी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे, कारण भाजपने गोव्याच्या विकासाला बाधा आणली आहे आणि थ्री लिनियर प्रकल्प आणून पर्यावरणाचा ऱ्हास केला आहे.’’असे चोडणकर म्हणाले. असंवेदनशील भाजप सरकारमुळे त्रस्त असलेल्या समाजातील सर्व घटकांशी राहुल गांधी संवाद साधणार असल्याची माहिती चोडणकर यांनी दिली.