आता महाडिक कुटुंबाचा बॅड पॅच संपला; भाजपचा पश्चिम महाराष्ट्रात विस्तार करणार – महाडिक 

मुंबई :  राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha elections) महाविकास आघाडीचे (MVA) तीन उमेदवार विजयी झाले आहे. तर भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. पण, या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. कारण, महाविकास आघाडीची अनेक मते फुटली असल्याचे समोर आले आहे. या निवडणुकीत भाजपने (BJP) केलेली खेळी यशस्वी झाली असून सहाव्या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिकांचा (Dhananjay Mahadik) विजय झाला आहे. विरोधीपक्ष नेते  देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी खेळलेल्या खेळीला यश आले आहे.

दरम्यान,  या विजयानंतर धनंजय महाडिक प्रचंड आनंदी दिसत आहेत. या विजयाची खात्री असल्यानेच देवेंद्र फडणविसांनी आपल्याला उमेदवारी दिल्याचं त्यांनी म्हटलं. शिवाय त्यांना त्यांचे राजकीय विरोधक सतेज पाटील (Satej Patil) यांच्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा “बॅड पॅच संपला!”, अशी प्रतिक्रिया धनंजय महाडिकांनी दिली.

ही वस्तूस्थिती आहे की मागच्या काही वर्षांपासून आमच्या घराला यश मिळत नव्हतं. वारंवार पराभवाला सामोरं जावं लागत होतं. पण सध्या भाजपच्या पाठिंब्यामुळे आम्ही हा विजय मिळवू शकलो. आता महाडिक कुटुंबाचा बॅड पॅच (Bad patch) संपला आहे. सहावी जागा म्हणजे रिस्क होती. ती रिस्क भाजपने घेतली. आणि महाडिक कुटुंबातील एकाला ही संधी दिली, या संधीचं आम्ही भविष्यत नक्कीच सोनं करू. भाजपचा पश्चिम महाराष्ट्रात विस्तार करण्यासाठी मी कटिबद्ध राहील.