खळबळजनक! ओडिसाच्या २६ वर्षीय क्रिकेटरचा मृतदेह आढळला जंगलात लटकलेल्या अवस्थेत

क्रिकेटजगतातून एक धक्कादायक बातमी पुढे येत आहे. २६ वर्षीय महिला क्रिकेटपटू राजश्री स्वैन (Rajashree Swain) जी ११ जानेवारीपासून बेपत्ता होती, तिचा मृतदेह कटकच्या जिल्ह्यातील जंगलाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे. पोलिसांना राजश्रीची स्कूटी जंगलाजवळ उभी असलेली आढळली. पोलिसांचे म्हणणे आहे की, पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतर महिला क्रिकेटपटूच्या मृत्यूचे खरे कारण समोर येईल.

पोलिस उपायुक्त पिनाक मिश्रा म्हणाले, “याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राजश्री स्वान हिचा मृतदेह अथागढ परिसरातील गुरुडिझटिया जंगलात झाडाला लटकलेला आढळला. सध्या पोलीस या खून प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करणार आहेत.

ओडिशा क्रिकेट असोसिएशनने आगामी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी आयोजित केलेल्या प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्यासाठी पुरी जिल्ह्यातील ही महिला क्रिकेटपटू पुद्दुचेरी येथे आली होती, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, स्पर्धेसाठी निवडलेल्या १६ जणांच्या संघात स्थान मिळवण्यात राजश्री अपयशी ठरली. तिच्या एका रूममेटने सांगितले की, बुधवारी संध्याकाळी टीम सदस्यांची नावे जाहीर झाल्यानंतर ती रडताना दिसली आणि अचानक ती हॉटेलमधून गायब झाली. जेव्हा तिचे सहकारी राजश्रीशी फोनवर संपर्क साधू शकले नाहीत, तेव्हा प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जी यांनी कटकमधील स्थानिक मंगलबाग पोलिस ठाण्यात राजश्री हरवल्याची तक्रार दाखल केली.

कुटुंबियांनी केला हत्येचा आरोप
त्याचवेळी, राजश्रीच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, “तिच्या शरीरावर जखमांच्या खुणा होत्या आणि तिच्या डोळ्यांना इजा झाली होती. अशा स्थितीत तिची हत्या करण्यात आली आहे. मधल्या फळीत फलंदाजी करताना ती उजव्या हाताने वेगवान गोलंदाजी करत असे. कुटुंबाने असाही दावा केला की, “संघात निवडलेल्या इतर अनेक खेळाडूंपेक्षा राजश्री खूपच चांगली कामगिरी करत होती. यानंतरही तिची संघात निवड झाली नाही.

क्रिकेट असोसिएशनने निवडीत पक्षपात नाकारला
राजश्रीच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना क्रिकेट असोसिएशनचे सीईओ सुब्रत बेहरा म्हणाले की, “निवडीत कोणतीही चूक झाली नाही. संपूर्ण संघाची निवड अत्यंत पारदर्शक पद्धतीने करण्यात आली. जर आम्हाला राजश्री स्वेनशी अडचण असती तर तिला २५ सदस्यीय संभाव्य खेळाडूंमध्ये स्थान कसे मिळाले असते.”