राष्ट्रवादी व दीवा प्रतिष्ठानच्या वतीने शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘चित्र-शिल्प संवाद’ उपक्रमाचे आयोजन

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व दीवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ८ ते १२ डिसेंबर, २०२१ या काळात नामवंत चित्रकार आणि शिल्पकार एकत्र येऊन बालगंधर्व कलादालन त्याच प्रमाणे रंगमदिराच्या मागील कॅफेटेरिया येथे चित्र आणि शिल्प साकारणार आहेत. महाराष्ट्रातील अशा प्रकारचा आणि इतक्या भव्य प्रमाणात सादर होणारा हा एक आगळा-वेगळा ‘चित्र-शिल्प संवाद’ उपक्रम आहे. अशी माहिती माजी उपमहापौर, नगरसेवक व दीवा प्रतिष्ठानचे संस्थापक दीपक मानकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेला प्रसिद्ध चित्रकार मुरली लाहोटी, शिल्पकार बापूसाहेब झांजे, शिल्पकार विवेक खटावकर, चित्रकार निलेश आर्टिस्ट, दत्ता सागरे, प्रशांत जगताप (अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पुणे), अंकुश काकडे (प्रवक्ता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) हर्षवर्धन मानकर (अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कोथरूड विधानसभा), करण मानकर (अध्यक्ष, दीवा प्रतिष्ठान) आदी मान्यवर उपस्थित होते.

दीपक मानकर म्हणाले, महाराष्ट्राचे भाग्यविधाते आणि माननीय शरद पवार साहेब यांचे राजकीय गुरु स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांचा सुसंस्कृतपणाचा त्याच प्रमाणे कलावंत आणि खेळाडूंवर प्रेम करण्याचा वारसा पवार साहेबांनी आयुष्यभर जोपासला, नुसताच जोपासला नाही तर तो आणखीन समृद्ध केला. चित्रकला आणि शिल्पकलेच्या बाबतीत बोलायचं तर आदरणीय पवार साहेबांनी चित्रकार आणि शिल्पकार यांना राजाश्रय दिला आणि त्यांची कला समृद्ध होण्यास मदत केली.

या ‘चित्र-शिल्प संवाद’मध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अनेक चित्रकार आणि शिल्पकार सहभागी होणार आहेत. हे चित्रकार आणि शिल्पकार आपल्या कलाकृती निर्माण करत असताना, रसिकांना त्या बघण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. एखादी कलाकृती निर्माण होताना बघण्याची एक सुंदर संधी या निमित्ताने रसिकांना उपलब्ध होणार आहे.

या व्यतिरिक्त ८ ते १२ डिसेंबर, २०२१ या काळात प्रत्येक दिवशी चित्रकला आणि शिल्पकला यातील दोन गुरुतुल्य कलाकार आपली प्रात्यक्षिके सादर करतील. पुणे आणि परिसरातील विविध कला महाविद्यालयातील विद्यार्थी आणि नवोदित कलाकारांसाठी हि एक मोठी पर्वणी असणार आहे. त्याचप्रमाणे बालगंधर्व कलादालन येथे जवळ-जवळ शंभर चित्रकारांच्या चित्रकृतींचे प्रदर्शन देखील आयोजीत करण्यात येणार आहे. असेही मानकर यांनी सांगितले.