एका बाजूला कसब्यातील उमेदवारीवरून ब्राम्हण समाज नाराज असल्याच्या चर्चा तर दुसऱ्या बाजूला ‘ही’ पोस्ट होतेय व्हायरल

पुणे : कसबा पेठ मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आणि पुण्यात राजकीय चर्चांना उधाण आले. पुण्याची राजकीय संस्कृती तशी सभ्य आहे. सर्व राजकीय पक्षांचे लोक जाती पातीच्या वर जाऊन पक्षाच्या वैचारिकतेशी बांधिलकी ठेऊनच वागतात. मागच्या महिन्यात आमदार मुक्ताताई टिळक यांचे कर्करोगाने दुर्दैवी निधन झाले, व त्यामुळे कसबा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली. निवडणूक म्हणल की साम -दाम -दंड – भेद सर्व मार्गाने प्रयत्न सुरु होतात. ही पोटनिवडणूक तरी त्याला कशी अपवाद ठरेल? परंतु हि निवडणूक कसब्याच्या मतदारांच्या लक्षात राहणारे प्रामुख्याने २ कारणांनी. एक म्हणजे हि निवडणूक आजारपणामुळे गिरीशजी बापट यांच्या सारख्या मुरब्बी व मातब्बर नेत्याच्या ग्राउंड वरच्या उपस्थिती शिवाय होत आहे, भाजपचे उमेदवार हेमंत रासने (BJP candidate Hemant Rasane) हे गिरीश बापट यांचेच शिष्य आहेत. दुसरे कारण म्हणजे काही समाजकंटकांनी जातीयवादी बॅनर लावून केलेल्या केविलवाण्या विकृती मुळे. समाजकंटक, जातीयवादी, केविलवाणा आणि विकृत ही ४ विशेषणे वापरण्यामागचे कारण सांगतो. मुळात भाजपा हा पक्षच जाती विरहित आहे. संघाच्या संस्कारांमुळे आणि भारताचे स्थान जगात विश्वगुरू करायचे स्वप्न असल्यामुळे भाजपमध्ये जातीपातीच्या नगण्य स्थान आहे. भाजप मध्ये सदस्य होताना किंवा दैनंदिन कामात कोणीही कुणालाही कधीही जात विचारात नाही. तसेच भाजपने कधीही कोणत्या जातीयवादी संघटनेला किंवा विचारसरणीला खतपाणी दिलं नाही. असं अशी पोस्ट सध्या समाजमाध्यमांवर लिहिली आहे तसेच विविध माध्यमांनी याबाबत वृत्त दिले आहे.

त्यात पुढे असं म्हटलं आहे की, थोरल्या पवारांनी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड सारख्या सापांना दूध पाजून महाराष्ट्राच्या राजकारणाचा उकिरडा करून टाकला,  त्याला पहिला झटका २०१४ मध्ये भाजपने दिला. समाजातील काही बोगस लेखक घेऊन त्यांच्या समोर २ बिस्किटे फेकून इतिहासाचे जे विकृतीकरण व दैत्यीकरण सुरु आहे.  हा व्यापक राजकारणाचा भाग आहे. श्रीमंत कोकाटे, अंधारे ताई, मिटकरी हे जितके जातीयवादी तितकेच कसबा मतदारसंघात निनावी बॅनर लावणारेही जातीयवादी आहेत. कोणते तरी खोटे कारण काढून २ गटात भांडणे लावणे हे समाजकंटकांचे पहिले काम असते. लोकांना विधायक कार्य करून जोडणे हि संस्कृती असते आणि जाती जातीत भांडणे लावणे ही विकृती. अशी विकृत प्रवृत्ती जागीच ठेचली पाहिजे. ब्राम्हण समाज हा कायमच पुरोगामी राहिला आहे. प्रत्येक समाजात जसे काही समाजकंटक लोक असतात.  तसेच अगदी नगण्य असे समाजकंटक ब्राम्हण समाजात सुद्धा असणार. अशा लोकांनी हजारो जातीयवादी बॅनर जरी लावले तरी एकही ब्राम्हण मतदार विचलित होणार नाही.

ब्राम्हण समाज कधीच असल्या बेनामी काम करणाऱ्यांना पाठिंबा देत नाहीत. ब्राम्हण समाज हा शैक्षणिक व सामाजिक दृष्टीने सुद्धा पुढारलेला आहे. भावनिक होऊन खोट्या प्रचाराला बळी पडून किंवा फक्त जात पाहून तो मतदान करत नाही. उमेदवाराची विकास करण्याची दृष्टी व क्षमता याच मुद्द्यावर तो मतदान करतो. २०१४, २००९, २००४ च्या विधानसभेत झालेले मतदान हे त्याची साक्ष देतात. २०१४ मध्ये रोहित टिळक यांच्या पेक्षा दुपटीहून जास्त मते गिरीश बापटांना मिळाली आहेत. २००९ मध्ये रोहित टिळक हे थेट ३ऱ्या स्थानावर राहिले आहेत तर हिंदुमहासभेचे मिलिंद एकबोटे यांना १०२७ मते मिळाली आहेत. २००४ मध्ये हिंदुमहासभेच्या हिमानी सावरकर यांना ११५८ मते मिळाली आहेत. कोथरूड मतदार संघात सुद्धा २००९ मध्ये हिंदुमहासभेच्या हिमानी सावरकर यांना ६८४ व पल्लवी हर्षे यांना ४१० इतकीच मते मिळाली. १९७८ च्या विधानसभा निवडणुकीत शिवाजीनगर मतदारसंघात शांती नारायण नाईक यांनी कलमाडी यांना हरवले होते. यातून हे सिद्ध होते की ब्राम्हण समाज हा अतिशय विचारपूर्वक मतदान करतो. ‘नोटा’ सारख्या भंपक व वांझोट्या प्रकाराला थारा देत नाही. उमेदवाराचा पक्ष व विचारधारा जर देशाभिमानी व संस्कृतीरक्षक असेल त्यालाच मत दिले जाते.

देशाच्या, राज्याच्या आणि पुण्याच्या इतिहासात फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षानेच ब्राम्हण समाजाला योग्य संधी व प्रतिनिधित्व दिले आहे. २०१९च्या विधानसभेत देवेंद्र फडणवीस, पराग आळवणी, अतुल भातखळकर, संजय केळकर, सुधीर गाडगीळ व मुक्ताताई टिळक हे ब्राम्हण समाजाचे ६ आमदार निवडून आले होते. तसेच विधान परिषदेत श्रीकांत भारतीय हे सुद्धा ब्राम्हण समाजाचे नेतृत्व आहे. गिरीश व्यास व अनिल सोले हे विधान परिषदेचे २ माजी आमदार ही ब्राह्मणच आहेत. १९९५ ते १९९९ पर्यंत असलेल्या युतीच्या सरकार मध्ये मनोहरजी जोशी हे ब्राम्हण समाजाचे मुख्यमंत्री झाले होते.  त्यावेळी भाजपने त्यांना बिनशर्त स्वीकारले होते. २०१४ ते २०१९ मध्ये कोणीही विचार पण केला नव्हता की एक ब्राम्हण आमदार फक्त त्याच्या नेतृत्व गुणामुळे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकतो, असे असताना देखील देवेंद्र यांनी ५ वर्षे पूर्ण कार्यकाळ पुरा केला. त्यांना विरोध करायला राष्ट्रवादीने जातीच्या नावाने अनेक आंदोलने केली. परंतु चंद्रकांत दादा पाटील, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार असे नेते तेंव्हा देवेंद्रजींच्या मागे उभे राहिले.

राज्यातील कोणतीही नगरपालिका घ्या किंवा महानगरपालिका घ्या, सर्वात जास्त तिकिटे भाजपने दिली आहेत. महापौर, स्थायी समिती, विविध समित्या यात ब्राम्हण समाजाला सर्वात जास्त वाटा हा फक्त आणि फक्त भाजपनेच दिला आहे. पुण्याचेच उदाहरण घ्यायचे तर रामभाऊ म्हाळगी, डॉ. लेले, अण्णा जोशी, गिरीश बापट, विकास मठकरी, उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी, मुक्ताताई टिळक, धीरज घाटे (Rambhau Mhalgi, Dr. Lele, Anna Joshi, Girish Bapat, Vikas Mathkari, Ujjwal Keskar, Suhas Kulkarni, Muktatai Tilak, Dheeraj Ghate) यांना नेतृत्व दिले. पुणे महानगर पालिकेवर ज्यावेळी पूर्ण बहुमताने सत्ता आली तेव्हा भाजपने इतर कोणाला न करता आदरपूर्वक मुक्ताताईंनाच महापौर पदी विराजमान केलं. पक्ष संघटनेत सुद्धा ब्राम्हण समाजाला कायमच अतिशय महत्वाची पदे दिली आहेत. प्रदेशाध्यक्ष पदापासून कार्यालय प्रमुख, संघटन मंत्री, मुख्यालय प्रभारी, सहप्रभारी, प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा, राष्ट्रीय महिला मोर्चा अध्यक्षा, प्रदेश सरचिटणीस, प्रदेश प्रवक्ते इत्यादी अत्यंत महत्वाच्या व निर्णय अधिकार असलेल्या पदांवर ब्राम्हण समाजाला अनेकदा संधी मिळाली आहे, मिळत आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने ब्राम्हण समाजावर अन्याय केला, ब्राम्हण समाजाला वाळीत टाकले, दुर्लक्ष करत आहे वगैरे वगैरे काहीहि झालेले नाही.

अजून एक मुद्दा म्हणजे अशी जातीयवादी हाकाटी जे मारत आहेत. त्यांना समोर येण्याची लाज का वाटत आहेत? ते निनावी बॅनर का लावत आहेत? त्यांच्या स्वतःच्या पक्षाने भाजप पेक्षा एक दशांश तरी प्रतिनिधित्व ब्राम्हण समाजाला दिले आहे का ? ब्राम्हणाच्या विरोधात विखारी व अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन कोण टीका करत? सर्व च्या सर्व ब्राम्हण लोकांचा ‘अनाजीपंत’ असा हेटाळणी पूर्वक उल्लेख करून कोण अपमान करत? ब्राम्हण द्वेषावर कोणाचे पोटपाणी चालले आहे? भटजी लोकांचा जाहीर सभेत अपमान कोण करत आहे? हिंदू देव देवता यांचा जाहीर उपमर्द कोण करत आहे? भांडारकर कोणी फोडले? छ. संभाजी महाराज उद्यानातील राम गणेश गडकरी पुतळा कोणी फोडला ? छ. शिवाजी महाराजांपेक्षा औरंजेब कोणाला जवळचा आहे?

कालच आदरणीय शैलेशजी टिळक व कुणाल टिळक यांनी सर्व माध्यमांसमोर स्पष्ट शब्दात सांगितले आहे की कोणतीही नाराजी ना ठेवता पूर्णपाने मनापासून निवडणुकीत सहभागी होणार आहे, पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडणार आहे, हेमंत रासनेंनाच निवडून आणणार आहे, मुक्ताताईंचे स्वप्न पूर्ण करणार आहे. आणि कालच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सुद्धा किळसवाणे व संकुचित राजकारण करणाऱ्या नाना पटोलेंना जाहीर आव्हान दिले आहे – “भाजप पेक्षा एक दशांश जरी प्रतिनिधित्व किंवा न्याय काँग्रेस वा राष्ट्रवादी काँग्रेस ने दिलेला पुरावा द्या – मंत्रिपदाचा राजीनामा देतो, निवडणूक बिनविरोध करा – उमेदवार बदलतो” पवार – पटोले यांना ब्राम्हण जातीशी काही घेणेदेणे नाहीये, फक्त समाजात दुफळी माजवणे हे एकच उद्दिष्ट आहे, तसे नसते तर त्यांनी रोहित टिळक किंवा कसबा मतदारसंघातीलच काँग्रेसचे निष्ठावंत असलेल्या गाडगीळ घराण्यातील कोणाला का नाही उमेदवारी दिली? ब्राम्हण समाजाचे तोतया व स्वार्थी प्रतिनिधी सध्या देशद्रोही लोकांच्या गोटात आहेत. हे असे प्रतिनिधी आहेत की ज्यांच्या मागे एकही व्यक्ती नाही. कोणीही ब्राम्हण त्यांना आपले प्रतिनिधी मानत नाही. जुन्या ‘गुजराती’ भाषेत ‘दोन’ हा अंक ‘दुवे’ असा उच्चारतात. दोन्ही कडून तोडपाणी करणाऱ्यांना वा दोन ठिकाणी निष्ठा ठेवणाऱ्यांचा उच्चार ‘दवे’ असा करतात का याचा शोध घ्यायला हवा. शेवटी एकच, हत्तीचा आणि माणसाचा रक्तगट कसा जुळला असे प्रश्न विचारणाऱ्या पक्षाला मत द्यायचे की गणपती बाप्पाच्या सच्च्या सेवकाच्या पक्षाला मत द्यायचे हे आधी ठरवावे – जात, पात, कुळ, गोत्र कोणते ते ठरवायला २६ फेब्रुवारी नंतर वेळ आहे.