‘एकवेळ समुद्राची खोली मोजता येईल मात्र शरद पवारांच्या मनात काय आहे, हे सांगता येणार नाही’

मुंबई :  राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे (MVA) तीन उमेदवार विजयी झाले आहे. तर भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. पण, या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. कारण, महाविकास आघाडीची अनेक मते फुटली असल्याचे समोर आले आहे. या निवडणुकीत भाजपने केलेली खेळी यशस्वी झाली असून सहाव्या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिकांचा विजय (BJP’s Dhananjay Mahadik’s victory) झाला आहे. विरोधीपक्ष नेते  देवेंद्र फडणवीस यांनी खेळलेल्या खेळीला यश आले आहे.

महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सत्ताधारी आघाडीने सहापैकी तीन जागा जिंकल्या, तर भाजपाला तीन जागा मिळाल्या. भाजपाच्या विजयी उमेदवारांमध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयल, माजी राज्यमंत्री अनिल बोंडे आणि पक्षाचे नेते धनंजय महाडिक यांचा समावेश आहे.राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगडी आणि शिवसेनेचे संजय राऊत हेही राज्यसभेवर निवडून आले आहेत. शिवसेनेला राज्यसभा निवडणुकीत भाजपाने धूळ चारली आणि शिवसेनेची पुरती नाचक्की झाली.

दरम्यान, काठावर पास झालेल्या खासदार संजय राऊतांनी अपक्ष आमदारांची नावे घेत त्यांच्यावर पराभवाचे खापर फोडले. यानंतर आता मंत्री बच्चू कडू यांनी संजय राऊत यांना खडेबोल सुनावले.  शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसने आपापल्या उमेदवारांना जास्तीची मते टाकून सुरक्षित करण्याच्या नादात मविआचा गेम बिघडवला त्यामुळे हा पराभव झाला. सरसकट अपक्षांना बदनाम करून चालणार नाही. काही अपक्ष मविआसोबतच होते, असे सुनावत अमरावती जिल्ह्यातील एक अपक्ष आमदार जो सरकारसोबत आहे, तो या घोडेबाजारात सहभागी होता, असा गौप्यस्फोट बच्चू कडू यांनी केला आहे.

जसा तुमच्या पक्षाच्या आमदारांवर दबाव आहे तसाच अपक्षांवरही असू शकतो. घोडेबाजार किंवा ईडी, सीबीआय काहीही. यामुळे कोणालाही पराभवासाठी जबाबदार ठरविण्यापेक्षा त्यांना समजून घ्यायला हवे. पक्षांनी रिस्क घेतली असता तर आज चित्र वेगळे असले असते. विधान परिषदेत हे चित्र बदलू शकते, असे सांगतानाच एकवेळ समुद्राची खोली मोजता येईल मात्र शरद पवारांच्या मनात काय आहे, हे सांगता येणार नाही. त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या केलेल्या कौतुकामध्ये एक वेगळा डाव असू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला आहे.