एक दिवस पुन्हा काँग्रेसचीच सत्ता देशात व राज्यात येईल : बाळासाहेब थोरात

मुंबई –  सध्या देशातील वातावरण बदलेले आहे. संविधानावर घाला घातला जात आहे तसेच काँग्रेसची विचारधारेलाच संपवण्याचे काम पद्धतशीरपणे केले जात आहे. हे हल्ले परतवण्यासाठी काँग्रेसच्या विचारधारेला माननारे निष्ठावान कार्यकर्ते तयार झाले पाहिजेत असं महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांनी म्हटले आहे.

टिळक भवन (Tilak Bhawan) येथे पक्षप्रभारी एच. के. पाटील (H.K. Patil) , प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(nana Patole) , निवडणूक अधिकारी व माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू  यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली विस्तारीत कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले,  सर्वात महत्वाची विचारधारा आहे, ती रुजली पाहिजे. काँग्रेस पक्ष संघटन बळकट करण्यावर भर देऊ आणि एक दिवस पुन्हा काँग्रेसचीच सत्ता देशात व राज्यात येईल यासाठी प्रयत्न करुया. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, राज्य निवडणूक अधिकारी पल्लम राजू यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.

दरम्यान, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या उदयपूर येथे झालेल्या नवसंकल्प शिबिराच्या धर्तीवर महाराष्ट्रातही दोन दिवसांचे राज्यस्तरीय शिबीर आयोजित करण्यात आले आहे. १ व २ जून रोजी शिर्डी येथे हे शिबीर होत आहे, या शिबिराला राज्यातील मंत्री, सर्व जिल्हाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी उपस्थित असतील. उदयपूरच्या नवसंकल्प शिबिरातील सर्व मुद्दे राज्यातील शेवटच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहचवले जातील, अशी माहिती एच. के. पाटील यांनी दिली.

यावेळी मार्गदर्शन करताना एच. के. पाटील म्हणाले की, राज्यस्तरीय शिबिरानंतर ९ ते १४ जून दरम्यान जिल्हास्तरीय शिबीर आयोजित करण्यात येतील. या शिबिराला मंत्री व राज्यातील जेष्ठ नेतेही उपस्थित राहतील. पक्ष संघटन मजबूत करण्याबरोबरच काँग्रेस पक्षाला राज्यात पुन्हा उभारी देण्यावरही भर देण्यात येईल. स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सर्व जिल्ह्यात ९ ते १५ ऑगस्टदरम्यान ७५ किमीची ‘आझादी गौरव पदयात्रा’ काढली जाणार आहे. उदयपूर घोषणापत्रातील  एक व्यक्ती, एक पद, या मुद्द्यासह इतर सर्व मुद्द्यांची राज्यात अंमलबजावणी केली जाणार आहे.