विरोधकांनी उडवली पंतप्रधानांची खिल्ली, पण रोहित पवार उतरले मोदींसाठी मैदानात !

पुणे : आपल्या बेधडक भाषणासाठी जगभरात ख्याती असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक भाषण सध्या जोरदार चर्चेत आहे. मात्र हे भाषण त्यांच्या खास शैलीसाठी वा बेधडकपणासाठी नव्हे तर या भाषणादरम्यान टेलिप्रॉम्टर बंद पडल्याने पंतप्रधानांच्या उडालेल्या गोंधळामुळे प्रचंड चर्चेत आहे.

या प्रकरणावरुन विरोधकांनी पंतप्रधानांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे मात्र राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी वेगळीच भूमिका घेत मोदींसाठी मैदानात उतरलेलं पाहायला मिळत आहे. ‘इकॉनॉमिक फोरम’च्या ऑनलाईन बैठकीत काल बोलत असताना Teleprompter बंद पडल्याने पंतप्रधानांच्या भाषणात अडथळा आल्याचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होतोय… अनेकजण याबाबत खिल्ली उडवतात… पण मला वाटतं अशी खिल्ली उडवणं चुकीचं आहे… असं रोहित पवार म्हणाले आहेत.

तर एखाद्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यासपीठावर पंतप्रधान बोलत असताना ते देशाचे प्रतिनिधी म्हणून बोलत असतात. अशा वेळी Teleprompter चाच आधार घ्यावा लागतो. यावेळी चुकूनही एखादा शब्द चुकीचा गेल्यास ते देशासाठी परवडणारं नसतं. त्यामुळं या गोष्टीची चेष्टा करणं योग्य नाही! असं देखील रोहित पवार म्हणाले आहेत.

काय आहे प्रकरण ?

भारतीयांनी करोनाविरुद्ध लढा कसा दिला यासंदर्भात बोलताना भारतीयांची इच्छाशक्ती चांगली आहे, असं मोदी म्हणाले. मात्र त्यानंतर टेलिप्रॉम्टरमध्ये काहीतरी तांत्रिक अडचण आली आणि तो बंद झाला. यानंतर पंतप्रधान मोदी भाषण देता देता थांबले. ते गोंधळून आणि थोड्या संतापलेल्या हावभावासहीत स्क्रीनच्या उजवीकडे पाहू लागले. नंतर त्यांनी निराश होऊन हात वर करत अखेर कानात हेडफोन लावत आपल्या भाषणामध्ये झालेल्या गोंधळानंतर समोरच्यांना ऐकू येतंय का हे विचारु लागले.