शेतकरी, उद्योजक, वाहतूकदार यांना संधी; वीज उत्पादन प्रक्रियेत ५% जैव इंधन वापराचे निर्देश

पुणे – महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित (महानिर्मिती) ही राज्य शासनाच्या मालकीची कंपनी असून स्थापित क्षमतेच्या बाबतीत नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन(National Thermal Power Corporation) पाठोपाठ वीजनिर्मिती क्षेत्रातील देशातील दुसऱ्या क्रमांकाची वीजनिर्मिती कंपनी आहे.

जैव इंधनाचा वापर करणे व पर्यावरणपूरक वीज निर्मितीला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने विद्युत मंत्रालय, भारत सरकार यांचे सूचनेनुसार “मिशन समर्थ”(mission  samartha) अंतर्गत औष्णिक वीज केंद्रात कोळश्यासोबत किमान ५ % इतक्या प्रमाणात बायोमास पेलेट इंधनाचा मिश्रित वापर करण्याचे निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कं . मर्यादित (महानिर्मिती) तर्फे २८ मार्च रोजी हॉटेल नोवोटेल पुणे येथे ‘ औष्णिक वीज निर्मिती केंद्रात बायोमास पॅलेटचा प्रभावी वापर ‘या विषयावर आधारित संबंधित शेतकरी व लघु/मध्यम उद्योजक यांचा प्रातिनिधिक सहभाग असणाऱ्या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे.

या कार्यशाळेमध्ये प्रामुख्याने बायोमास जैव इंधन वापर या विषयावर राष्ट्रीय पातळीवरील संबंधित तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार असून जैव इंधन निर्मिती करणारे लघु/मध्यम उद्योजक, जैव इंधनकरिता कच्चा माल पुरवठा करणारे शेतकरी यांचेकरिता मार्गदर्शनपर सत्रे आयोजित केली जाणार असून या विषयाशी संबंधित माहिती देणारे विविध प्रदर्शनी स्टॉल्स देखील असणार आहेत.

सदर कार्यशाळेचा मूळ हेतु हा पर्यावरण संवर्धनासाठी कोळश्याचा वापर किमान काही प्रमाणात कमी करून राखेची मात्रा कमी करणे हा असल्याने आगामी काळात महानिर्मितीच्या औष्णिक वीज केंद्रास बायोमास इंधन पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन त्यासाठी शेतकरी व लघु/मध्यम उद्योजक यांची एक दीर्घकालीन पुरवठा साखळी व्यवस्था (Supply Chain) स्थानिक पातळीवर तयार होऊन त्यायोगे कृषी व लघु–मध्यम उद्योग क्षेत्राला आर्थिक चालना मिळावी असा प्रयत्न केला जाणार आहे. जैव इंधन तंत्रज्ञान, संधी, आव्हाने,संशोधन, बाजारपेठ विश्लेषण आणि कर्ज उपलब्धता इत्यादी बाबींवर या कार्यशाळेत विचारमंथन होणार आहे. या कार्यशाळेमध्ये केवळ निमंत्रित सदस्यांना सहभागी होता येणार आहे.