अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ओसामा बिन लादेनचा गुरू अयमान अल्-जवाहिरी ठार

काबुल – अमेरिकेने अल्- कायदाचा नेता अयमान अल्-जवाहिरीला (Al-Qaeda leader Ayman al-Zawahiri) अफगाणिस्तानमध्ये एका ड्रोन हल्ल्यात ठार केलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (US President Joe Biden) यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. रविवारी (31 जुलै) अमेरिकेची केंद्रीय गुप्तचर यंत्रणा सीआयएने अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये दहशतवादविरोधी मोहीम राबवली होती. याच मोहिमेमध्ये जवाहिरीचा मृत्यू झाला आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, ड्रोनने त्याच्यावर दोन क्षेपणास्त्रे डागली तेव्हा जवाहिरी एका सुरक्षित घराच्या बाल्कनीत होता. अल-जवाहिरीवर $25 दशलक्ष इनाम जाहीर करण्यात आले होते. अमेरिका बराच काळ त्याचा शोध घेत होती. अल-जवाहिरी हा अमेरिकेतील 9/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार होता. याशिवाय त्याच्यावर अनेक दहशतवादी घटना घडवून आणल्याचाही आरोप आहे.

अल-जवाहिरीविरोधात अमेरिकेने ६ महिन्यांपूर्वी कारवाई सुरू केली होती. ही कारवाई करण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी जवाहिरीचा शोध तीव्र करण्यात आला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जवाहिरीला मारण्यासाठी अमेरिकेने आपल्या धोकादायक निन्जा मिसाईल I9X या शस्त्राचा वापर केला आहे.