विकास प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकतात हे आपल्या सरकारनं सिद्ध केलं आहे – मोदी

पुणे – विकास प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकतात हे आपल्या सरकारनं सिद्ध केलं आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. पुण्यात आज अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. वाढत्या शहरीकरणामुळे संधी आणि आव्हानंही समोर येत असून शहरामध्ये उड्डाणपूल आणि रस्ते रुंदीकरणासारख्या वाहतूक पायाभूत सुविधा विकसित करण्यावर मर्यादा आहेत; त्यामुळे मेट्रो रेल्वे सारखी सार्वजनिक वाहतूक हा एकमेव पर्याय आहे, असं ते म्हणाले.

विशेषतः शिकलेल्या लोकांनी मेट्रो सेवा वापरण्याची सवय लावून घ्यावी; त्याचा फायदा त्यांच्या शहराला होईल, असं मोदी म्हणाले. हरित वाहतूक, इलेक्ट्रिक वाहनं, इंटिग्रेटेड कमांड सेंटर्स, सर्वोत्तम व्यवस्थापन प्रणाली आणि पाणी शुद्धिकरण प्रकल्प शहरांना जलयुक्त बनवण्यासारख्या योजना दृष्टीपथात ठेवून सरकार पुढे जात आहे, असं पंतप्रधानांनी सांगितलं. राज्यपाल भगत सिंग कोश्यारी, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार प्रकाश जावडेकर, गिरीश बापट आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुणे मेट्रो प्रकल्पाचं अधिकृत उद्घाटन करण्यात आलं. गरवारे महाविद्यालय मेट्रो स्थानकावर झालेल्या या सोहळ्याप्रसंगी मोदींनी गरवारे मेट्रो स्थानकावरील प्रदर्शनाचं उद्घाटन आणि पाहणीही केली; तसंच तिथून आनंदनगर मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवास केला. प्रवासादरम्यान त्यांनी शालेय विद्यार्थ्यांशी संवादही साधला.

तत्पूर्वी, पुणे महापालिकेच्या आवारातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं त्यांनी अनावरण केलं. 1 हजार 850 किलोग्रॅमचा हा पुतळा गन मेटलपासून बनलेला असून त्याची उंची सुमारे साडे 9 फूट आहे. महापालिकेतर्फे राबवण्यात येणाऱ्या मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचं तसंच बालेवाडी इथं बांधण्यात आलेल्या आर के लक्ष्मण आर्ट गॅलरीचं उद्घाटन आणि बाणेर इथल्या ई-बस डेपोचं आणि 140 ई-बसेसचं लोकार्पण आज पंतप्रधानांच्या हस्ते झालं. पुणेकरांचं राहणीमान सुखकर करणाऱ्या विविध विकास प्रकल्पांसाठी त्यांनी पुणेकरांना शुभेच्छा दिल्या.

जगातील अनेक देशांना युद्धग्रस्त युक्रेनमधील आपल्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणणे अवघड जात असताना भारतीय विद्यार्थ्याना मायदेशी आणण्यासाठी भारताची ऑपरेशन गंगा मोहीम अत्यंत गतिमान पद्धतीनं सुरू आहे; असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुण्यात सांगितलं. सिम्बायोसिस संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. संस्थेच्या लवळे परिसरात ७० एकर परिसरात निर्माण करण्यात आलेल्या आरोग्यधाम संकुलाचं लोकार्पण मोदी यांच्या हस्ते झालं. युवा पिढीच्या सामर्थ्यावर केंद्र सरकारचा विश्वास असून कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रात निर्माण झालेल्या अनेक संधींचा लाभ युवकांनी घ्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं. देशासमोर असलेल्या विविध आव्हानांवर विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून आणि विद्यापीठातील संशोधनातून उत्तरं मिळायला हवीत, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.