आपली ताकद प्रचंड आहे, आपण भिडलो तर विरोधकांचा टिकाव लागणार नाही – जयंत पाटील

सातारा – आज महागाई, बेरोजगारी, आरोग्ययंत्रणा या मुळ विषयावर कोण काही बोलत नाही. मात्र ईडी (ED) , आयटी (IT) , सीबीआय (CBI) , भोंगा यावर चर्चा सुरू आहे याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (NCP) आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. आज सातारा (Satara) जिल्ह्यातील पाटण (Patan) विधानसभा मतदारसंघाचा आढावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी घेतला.

पवित्र गंगेतून (Ganga) मृतदेह वाहताना आपण सर्वांनी पाहिले मात्र महाराष्ट्रात आपण कोरोना काळात एक चांगली कामगिरी केली हेही जयंत पाटील यांनी आवर्जून नमूद केले. आपण चांगल्या कामाच्या जोरावर मतं मागू. सर्व आधुनिक व्यवस्था आत्मसात करू आणि एक चांगले यश संपादित करू असे प्रतिपादनही जयंत पाटील यांनी यावेळी केले.

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेचा आज साताऱ्यातील शेवटचा दिवस असून संपूर्ण राज्य फिरून आल्यानंतर ही यात्रा साताऱ्यात पोहोचली होती. कार्यकर्त्यांनी आपल्या अडचणी सांगितल्या या अडचणींची गांभीर्याने नोंद घेणार असल्याचे जयंत पाटील यांनी आश्वासन दिले.

मागच्या निवडणुकीत पाटण इथे पराभव झाला. इंदिरा गांधींचाही (Indira Gandhi) पराभव झाला होता मात्र मला इथल्या लोकांचे कौतुक करावेसे वाटते. कार्यकर्त्यांनी इथे पक्ष जिवंत ठेवला आहे. नाराजी असताना लोकांनी पक्षाची साथ सोडली नाही. ही आपल्या पक्षाची जमेची बाजू आहे. ही ताकद एकसंघ करण्याची वेळ आली आहे त्यासाठी बुथ कमिट्यांचे संघटन करा. आपली ताकद प्रचंड आहे, आपण भिडलो तर विरोधकांचा टिकाव लागणार नाही असा आत्मविश्वास जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांमध्ये भरला.

सगळ्या स्थानिक संस्थांमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बहुमत आहे. आता पक्ष वाढवायचा आहे, याची जबाबदारी प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी घ्यावी. पक्षाची नव्याने बांधणी करू, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका (Zilla Parishad, Panchayat Samiti elections) तोंडावर आहेत. आमचे सैन्य तयार आहे असे सत्यजित पाटणकर (Satyajit Patankar) यांनी सांगितले.

रामालाही वनवास भोगावा लागला होता तशी आजची परिस्थिती आहे. नव्याने आपण उभे राहूया. मी वडिलधारी आहे, तुम्हाला माझा संपूर्ण पाठिंबा आहे. पक्ष आपल्या पाठिशी खंबीर आहे. संघटना मजबूत करा असे आवाहन खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.

यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, सत्यजित पाटणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, आयटी सेलचे प्रमुख सारंग पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, युवक जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, संकल्प डोळस, महिला सरचिटणीस संगीता साळुंखे, तालुकाध्यक्ष राजाभाऊ शेलार, तालुका महिला अध्यक्षा स्नेहलताई जाधव, युवती अध्यक्षा रोहिणी पाटील आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.