राज्यसभेच्या सहा जागांपैकी महाविकास आघाडी चार जागांवर विजय मिळवून दाखवेल – राऊत

मुंबई – संभाजीराजे छत्रपती यांच्या उमेदवारीवरून गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या राज्यसभा निवडणुकीचा मुद्दा राजकीय वर्तुळात चर्चेचा ठरू लागला आहे. कोणत्या पक्षाचे किती आमदार यावरून राज्यसभेत जाणाऱ्या ६ सदस्यांची निश्चिती होणार आहे. आमदारांच्या संख्याबळानुसार प्रत्येक पक्षाकडून किती सदस्य राज्यसभेवर जाऊ शकतील, हे ठरणार असल्यामुळे आता आकडेमोडीला वेग आला आहे.

विशेषत: त्या त्या पक्षांचे आमदार वगळता अपक्ष आमदार आपली मतं कुणाच्या पारड्यात टाकणार, यावरून कोणत्या पक्षाचा अतिरिक्त सदस्य राज्यसभेवर निवडून जाणार हे ठरणार आहे. यातच शिवसेनेने दोन उमेदवार दिल्यामुळे अपक्ष लढणाऱ्या छत्रपती संभजीराजे ( Chatrapati Sambhajiraje ) यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. अनेक मराठा संघटना या शिवसेनेविरोधात आक्रमक झाल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेच्या वतीने संजय राऊत (Sanjay Raut ) आणि संजय पवार ( Sanjay Pawar ) यांनी अर्ज दाखल केला. निवडणूक आयोगाच्या कार्यालयात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे आणि महाविकास आघाडीचे सर्व खासदार, आमदार यावेळी उपस्थित होते. शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या वतीनं यावेळी मोठं शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. राज्यसभेच्या सहा जागांपैकी महाविकास आघाडी चार जागांवर विजय मिळवून दाखवेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.