राज्यात पुन्हा एकदा ‘बर्ड फ्लू’ने काढले डोके वर

नंदुरबार – राज्यात काही ठिकाणी बर्ड फ्लू रोगाच्या प्रादुर्भाव तपासणीचे निष्कर्ष पॉझिटिव्ह आले आहेत, असं वृत्त हिंदुस्तान समाचार या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. नंदुरबार जिल्ह्यात या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील पशुपालक, कुक्कूटपालन व्यावसायिक, व्यापारी, दुकानदार आणि नागरिकांनी जैवसुरक्षा उपाययोजनेचा अवलंब करावा, असं आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केलं आहे.

पोल्ट्री फार्ममध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनीच तिथे प्रवेश करावा. तिथं काम करणाऱ्या व्यक्तींचे बूट, कपड्यांसह हातपाय प्रवेश करण्याआधी आणि बाहेर आल्यानंतर जंतूनाशकाचा वापर करुन स्वच्छ करावेत. नवीन आणलेल्या पक्ष्यांना कमीत कमी 30 दिवस वेगळे ठेवावे. बर्डफ्लू रोग सदृश्य लक्षणांचं निरीक्षण करावं आणि लक्षणं आढळल्यास रोग सदृश्य पक्ष्यांची माहिती त्वरीत जवळील पशुवैद्यकीय संस्थांना द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

बाजारपेठेत पक्ष्यांना हाताळणाऱ्या व्यक्तींनी हातमोजे आणि तोंडावर मास्कचा वापर करावा. जिवंत पक्ष्यांच्या बाजारपेठेच्या जागेचं दररोज निर्जंतुकीकरण इत्यादी जैवसुरक्षा नियमांचं काटेकोरपणे पालन करावं, असं जिल्हाधिकारींनी म्हटलं आहे.