पठाणच्या निर्मात्यांनी पाकिस्तानी गाणे चोरून बनवले ‘बेशरम रंग’ साँग? पाकिस्तानच्या गायकाचा आरोप

शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) स्टारर हिंदी फिल्म ‘पठाण’ (Pathaan) प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात सापडली आहे. या सिनेमातील ‘बेशरम रंग’ (Besharam Rang) या गाण्यातील काही दृश्यांवर राजकीय नेत्यांनी आक्षेप नोंदवला असल्याने मोठा वाद छिडला गेला आहे. परिणामी सेंसर बोर्डाने त्या दृश्यांमध्ये बदल करण्याचे आदेश पठाणच्या निर्मात्यांना दिले आहेत. एकीकडे हा वाद शमत असताना पाकिस्तानचा गायक सज्जाद अली (Pakistani Singer Sajjad Ali) याने या गाण्यावरून बॉलीवूडवर निशाणा साधला आहे.

सिनेमाचे व गाण्याचे नाव न घेता सज्जाद अलीने पठाणच्या निर्मात्यांवर गाणे चोरीचा आरोप केला आहे. बेशरम रंग हे गाणे आपल्या जुन्या गाण्याशी मिळतेजुळते असल्याचा दावा पाकिस्तानी गायकाने केला आहे.

निर्मात्यांकडून ‘बेशरम रंग’ची चोरी?
पाकिस्तानी गायक सज्जाद अलीने म्हटले आहे की, ‘बेशरम रंग’ हे त्याच्या ‘अब के हम बिछडे’ या अनेक वर्ष जुन्या गाण्याशी मिळतेजुळते आहे. त्याने ‘पठाण’ चित्रपटाच्या निर्मात्यांचे, चित्रपटाचे किंवा गाण्याचे नाव न घेता चोरीचा आरोप केला आहे. सज्जाद अलीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो एका आगामी चित्रपटातील गाणे ऐकत असल्याचे सांगत आहे. हे गाणे ऐकताना आपल्याला आपण काही वर्षापूर्वी लिहिलेले गाणे आठवले, असे त्याने म्हटले आहे.

यानंतर गायक सज्जाद ‘पठाण’च्या ‘बेशरम रंग’ या गाण्याबद्दल बोलत असल्याचा अंदाज त्याचे चाहते आणि सोशल मीडिया यूजर्स लावत आहेत. सज्जादच्या व्हिडिओवर युजर्सनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘हे पठाणच्या बेशरम रंग गाण्यासारखे वाटते आहे.’ त्याच वेळी, असे बरेच वापरकर्ते आहेत जे म्हणत आहेत की, दोन्ही गाणी वेगळी आहेत. दोघांची चाल सारखीच असल्याचे काहींनी सांगितले.