‘काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांनी महाराष्ट्र धुवून खाल्लाय, हे किती धुतल्या तांदळाचे आहेत हे जनतेला माहिती आहे’

नांदेड  –  राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना ३ मार्च पर्यंत ED कोठडी सुनावली आहे. टेरर फंडिंग केल्याचा आरोप असणाऱ्या मलिक यांच्यावर कारवाई झाल्यानंतर आता महाविकास आघाडीच्या नेते आणि कार्यकर्ते  हे या अटकेच्या कारवाईचा निषेध व्यक्त करत आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या घडामोडींवर भाष्य करताना केंद्र सरकार, तपास यंत्रणा आणि भाजपला लक्ष्य केले तसेच  भविष्यातील वाटचाल कशी असावी याबाबत आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले,आरोप करून रान उठवायचं, बदनामी करून नेरेटिव्ह सेट करायचं, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून संविधानाने दिलेला आवाज उठवण्याचा हक्क चिरडायचा, असे प्रयत्न कपटी शत्रू करत असेल तर त्याविरोधात गांधीजींच्या सत्याच्या मार्गासोबतच भगतसिंग, राजगुरूंच्या आक्रमकतेच्या मार्गानेही लढावं लागेल.

दरम्यान, याच मुद्द्यावरून   रयत क्रांती संघटनेचे  युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.’आझाद मराठी’ला दिलेल्या प्रतिक्रियेत ते म्हणाले,  महाविकास आघाडीतील नेत्यांनी केंद्रीय तपास यंत्रणेविरोधात आदळ-आपट करण्याची गरज नाही. देशामध्ये काही चुकीचं घडलं असेल त्याची तपासणी करणे हे यंत्रणांचे कार्य आहे, त्यांचे ते काम योग्य करतील.

कर नाही त्याला डर कशाला पण काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांनी महाराष्ट्र एवढा धुवून खाल्लाय,आता त्यांचं पितळ उघडे होणार म्हणून, जनतेची दिशाभूल करून, जनतेची सहानभूती घेण्यासाठी केंद्र सरकारच्या विरोधात स्टेटमेंट देणारा एकमेव धंदा उरलेला आहे . राज्यातील जनतेला हे किती धुतल्या तांदळाचे आहेत निश्चितच माहिती आहे असे शिंदे यांनी म्हटले आहे.