‘लोकांच्या मनातला मुख्यमंत्री शब्द कुणी खेचू शकत नाही’, पंकजा मुंडेंचा फडणविसांना चिमटा

औरंगाबाद : नवी मुंबईतील बेलापूर येथे आमदार मंदा म्हात्रे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक राजकीय चर्चांना उधाण आणणारे वक्तव्य केले. ‘मला एकही दिवस जाणवले नाही, की मी मुख्यमंत्री नाही. मला आजही असे वाटते की मी मुख्यमंत्रीच आहे’ असे वक्तव्य त्यांनी केले होते.

‘तुमच्यासारखे नेते पाठीशी, सोबत असल्यामुळे मला एकही दिवस वाटले नाही की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नाही. मला आजही असे जाणवते की मी मुख्यमंत्रीच आहे. तुम्ही मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही. शेवटी मनुष्य कुठल्या पदावर आहे हे महत्वाचे नाही. तो काय करतो हे महत्वाचे आहे. गेली दोन वर्ष एकही दिवस घरात न थांबता मी जनतेच्या सेवेत आहे. त्यामुळे जनतेनेही मला जाणवू दिले नाही. मला आशीर्वाद मिळेल त्यावेळी मी याचठिकाणी मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी येणार आहे, असे फडणवीस म्हणाले.

दरम्यान, फडणवीस यांच्या या वक्तव्यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना फडणवीसांच्या विधानाबाबत असता, त्या म्हणाल्या की, ‘ही चांगली गोष्ट आहे की, त्यांना आजही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतंय. मात्र जनतेच्या मनातला मुख्यमंत्री हा शब्द कुणी खेचू शकत नाही’ असं म्हणत पंकजा मुंडेंनी यांनी फडणवीस सणसणीत टोला लगावला.