सगळेच मुंडे असे नाहीत, साहेबांच्या विचाराने चालणाऱ्या मुंडे मध्येच ‘तो’ गुण – पंकजा मुंडे

पुणे : उद्घाटन सोहळ्यांना केवळ हजेरी लावायची हा एकमेव उद्देश नसून त्यामागे लोकांच्यात जाऊन सामाजिक बांधिलकी जपणं, समाज घडवणे हा उद्देश असतो. मोठ्या हेल्थ सेंटरमध्ये देखील गरीबांना माफक दरात सेवा मिळावी व सर्वांना चांगले आरोग्य लाभावे, अशी भावना भाजप च्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.

प्रकृती केअर फाउंडेशनच्या वतीने आयोजित विशेष सेवा गौरव पुरस्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी सहाय्यक पोलिस आयुक्त मछिंद्र चव्हाण, सहाय्यक पोलिस आयुक्त (सेवा निवृत्त) मिलिंद पाटील, ज्येष्ठ नगरसेविका रंजनाताई टिळेकर, जनरल फिजिशियन डॉ. विजयकुमार भोर व युवा गिर्यारोहक स्मिता घुगे यांना लोकनेत्या पंकजा मुंडे यांच्या हस्ते विशेष सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी आमदार माधुरी मिसाळ, राष्ट्रीय स्वयंंसेवक संघाचे पुणे शहर कार्यवाहक महेशजी कर्पे, येवले उद्योग समूहाचे संस्थापक नवनाथ येवले, डायना बायोटेकचे एमडी विनोद पाटील, प्रकृती केअर फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. ज्ञानोबा मुंडे, प्रकृती केअर फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा शिवकन्या बारगजे उपस्थित होत्या. यावेळी लोकनेते गोपीनाथराव मुंडे डायग्नोस्टिक अँड हेल्थ केअर सेंटरच्या हडपसर शाखेचे उद्घाटन पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.

पंकजा मुंडे म्हणाल्या, एका छोट्या जागेत सुरू झालेल्या डायग्नोस्टिक सेंटर चे आज कार्पोरेट सारख सेंटर उभं राहिलं आहे. येथे गरीबांना माफक दरात सेवा तर मिळेलच शिवाय सामाजिक बांधिलकी जपणारे डॉ. मुंडे यांची ट्रिटमेंट ही मिळेल. त्यांच्या नावातच तो गुण आहे. पण सगळेच मुंडे असे नाहीत, साहेबांच्या विचाराने चालणारे मुंडेमध्येच तो गुण आहे अशी खोचक टिपणी त्यांनी केली.

डॉ. ज्ञानोबा मुंडे म्हणाले की, लोकनेते गोपीनाथराव मुंडे डायग्नोस्टिक अँड हेल्थ केअर सेंटरच्या पहिली शाखा ही 2016 मध्ये सुरु झाली. गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाने सुरू केलेल्या या सेंटरच्या माध्यमातून शेकडो लोकांची आरोग्य सेवा आजतागायत सुरू आहे आणि पुढेही सुरु राहील असा शब्द त्यांनी यावेळी दिला.

या कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड प्राधिकरणचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, नगरसेवक आबा तुपे, , नगरसेवक वीरसेन जगताप, नगरसेविका वृषाली कामठे, नगरसेवक श्री योगेश ससाने, नगरसेविका उज्वला जंगले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भूषण तुपे, जनसेवा बँकेचे संचालक रवी तुपे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. दादा कोद्रे, सामाजिक कार्यकर्ते अशोकभाऊ मुंडे, नगरसेविका योगिता नागरगोजे आदी उपस्थित होते.