अभिनेत्री परिणीती चोप्रा पडली प्रेमात? आम आदमी पार्टीच्या ‘या’ खासदारासोबत अफेयरच्या चर्चा

मुंबई- बॉलीवूड अभिनेत्री आणि राजकीय नेत्यांची अफेअर काही नवी नाहीत. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री स्वरा भास्कर हिने समाजवादी पार्टीचे नेते फहाद अहमद यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीने राजकीय नेत्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आहे. ही अभिनेत्री आणखी कोण नसून अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आहे.

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राच्या लव्ह लाईफची सध्या खूप चर्चा आहे, कारण तिचं नाव आम आदमी पार्टीच्या खासदाराशी जोडलं गेलं आहे. हा खासदार राघव चड्ढा (AAP MP Raghav Chadha) असून त्यांचे दोघांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. दोघेही मुंबईतील एका रेस्टॉरंटबाहेर एकत्र स्पॉट झाले आहेत. दोघांना एकत्र पाहून सोशल मीडियावर ते डिनर डेटसाठी रेस्टॉरंटमध्ये पोहोचल्याची चर्चा आहे. हे फोटो समोर येताच, सोशल मीडिया वापरकर्ते असा अंदाज लावत आहेत की परिणीती आणि राघव चड्ढा यांचे अफेअर सुरू आहे.

राघव चड्ढा आणि परिणीती या दोघांनीही या भेटीसाठी पांढरा टी-शर्ट परिधान केला होता. दोघांचे रंगसंगतीचे कपडे परिधान केल्यानेही लोकांमध्ये शंका निर्माण होत आहे. मात्र, आतापर्यंत या दोघांपैकी कोणीही त्यांच्या नात्याबद्दल अधिकृत भाष्य केलेले नाही.