कुत्र्याच्या वाढदिवसानिमित्त लाखो रुपये खर्चून पार्टी दिली, पण ‘तो’ व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी अटक केली 

गांधीनगर – गुजरात पोलिसांनी शनिवारी पाळीव कुत्र्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली तीन जणांना अटक केली. या वाढदिवसाच्या पार्टीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, त्याची दखल घेत गुजरात पोलिसांनी कारवाई केली आहे.

पोलिसांनी सांगितले की, चिराग पटेल नावाच्या व्यक्तीने आपल्या पाळीव कुत्र्या ‘एबी’चा वाढदिवस साजरा करण्यासाठी एका भव्य पार्टीचे आयोजन केले होते. अहमदाबादमधील मधुवन ग्रीन पार्टी प्लॉट येथे पार्टीसाठी मोठी जागा बुक करण्यात आली होती आणि भव्य सजावट आणि नृत्य इत्यादीची व्यवस्था करण्यात आली होती.

या पार्टीला मोठ्या संख्येने लोक पोहोचले होते.या पार्टीशी संबंधित अनेक व्हिडिओही लोकांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. असे दिसून आले आहे की मोठ्या संख्येने लोक पार्टीमध्ये आले आहेत आणि यातील बहुतेक लोक ना मास्क घातलेले होते ना ते कोरोनाचे नियम पाळत होते.

या व्हिडिओंच्या आधारे पोलिसांनी पार्टीच्या आयोजकांविरुद्ध महामारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुजरात पोलिसांनी सांगितले की, चिराग पटेलने आपल्या पाळीव कुत्र्याच्या या बर्थडे पार्टीवर 7 लाख रुपये खर्च केले होते.

शुक्रवारी कोविडचे ५,३९६ नवीन रुग्ण आढळले

याआधी शुक्रवारी गुजरातमध्ये कोरोना विषाणूचे ५,३९६ नवीन रुग्ण आढळले होते. कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता गुजरात सरकारने शुक्रवारी अनेक निर्बंध जाहीर केले होते. याअंतर्गत राज्यातील 10 शहरांमध्ये रात्रीचा कर्फ्यूही लागू करण्यात आला आहे.