बाभळगाव येथील पाटील बंधूने जीवापाड मेहनत करून संगोपन केलेल्या टोमॅटोस कवडीमोल भाव

सरासरी 40 ते 50 रूपये किलो भाव मिळणारे टोमॅटो अवघ्या दहा ते अकरा रुपयांनी विकावे लागते

तुळजापुर (श्रीकांत कदम ):- टोमॅटोस कवडीमोल भाव मिळत असल्याने बाभळगाव येथील पाटील बंधूना लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. मौजे बाभळगाव येथील प्रकाश पाटील व विकास पाटील या दोन बंधूंनी टोमॅटोच्या लागवटीतून बऱ्यापैकी उत्पन्न मिळेल या आशेपोटी हजारो रुपये खर्च करून दीड एकर शिवम ज्वारी जातीच्या गावरान टोमॅटोची लागण दोन महिन्यापूर्वी केली होती. योग्य नियोजन करीत वेळोवेळी खत औषध व ठिबक सिंचनच्या द्वारे पाण्याचे नियोजन केले.

पाटील बंधूंनी मेहनत केल्या प्रमाने टोमॅटोनी चांगलाच बहर घेतला. आता आपणांस या टोमॅटोपासून चांगला नफा होईल ही आशा पाटील बंधूंना होती. मात्र भाजी मार्केटमध्ये दोन महिन्यापूर्वी 70 ते 80 रुपये प्रति किलो दराने जाणारे टोमॅटो आज केवळ दहा ते अकरा प्रति किलो दराने जातात. त्यामूळे अचानक टोमॅटोचा भाव कमी झाल्याने टोमॅटोचे उत्पन्न चांगले निघून सुध्दा भाव कमी असल्याने होणाऱ्या नफ्यात मोठीच घट झाली. त्यामूळे चांगले उत्पन्न निघूनही बऱ्यापैकी नफा होत नसल्याची खंत प्रकाश पाटील व विकास पाटील या बंधूंनी प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केली.