हद्द झाली : सरकार गेलं, पदही गेलं तरीही पटोलेंचा शासकीय निवासस्थानीच मुक्काम

मुंबई : काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)  यांना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्याने त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून ते शिंदे, फडणवीस सरकार सत्तेत येईलपर्यंत विधानसभेच्या अध्यक्षांची जागा रिक्त होती. नवे सरकार सत्तेत आल्यानंतर देखील विधानसभेच्या अध्यक्षपदाचा मुद्दा चांगलाच गाजला होता. दरम्यान, आता विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन अनेक दिवस उलटल्यानंतरही  नाना पटोले यांनी शासकीय बंगला सोडलेला नसल्याचे वृत्त समोर आलं आहे.

नाना पटोले यांना विधानसभेचे अध्यक्ष असताना जो शासकीय बंगला मिळाला होता, तो अद्यापही त्यांनी खाली केला नसल्याने  उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान दुसरीकडे कुलाबा इथल्या तन्ना हाऊसमध्ये असलेल्या काँग्रेसच्या कार्यालयाची मुदत संपत आहे. त्यामुळे आता आपल्याच शासकीय निवासस्थानी पक्ष कार्यालय सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, असा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवल्याचा दावा नाना पटोले यांनी केला आहे. पटोले यांच्या या दाव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.