‘सार्वजनिक हिताच्या कुठल्याच कामाला पवारसाहेबांना कंटाळा येत नाही’

मुंबई – सांगलीतल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar) यांच्या पुतळ्याच्या लोकार्पणाचा वाद काल चांगलाच गाजला. खासदार शरद पवारांच्या हस्ते लोकार्पण करण्यास भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी कडाडून विरोध केला होता. पुढे पडळकर यांच्यासोबत माजी  सदाभाऊ खोतही पूर्ण ताकदीनिशी रस्त्यावर उतरले  आणि सरकारवर तोफ डागली.

यावेळी मेंढपाळाच्या हस्तेच लोकार्पण सोहळा व्हायला हवा, अशी भूमिका पडळकर यांनी मांडली. या भूमिकेला धनगर समाजाचा देखील पडळकर याना पाठींबा दिल्याचे दिसून आले  आहे. दरम्यान, माध्यमांशी बोलताना सदाभाऊ खोत यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे. सांगली जिल्ह्याशी काही संबंध नसताना शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन नको, त्यातर इतर स्थानिक नेत्यांची नावं वगळ्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच आतापर्यंत तुम्ही किती उद्घाटन केली कंटाळा आला नाही का ? असा  सवाल सदाभाऊ खोत यांनी पवारांना केला होता.

यानंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून खोत यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.  उद्घाटनेच काय तर सार्वजनिक हिताच्या कुठल्याच कामाला पवारसाहेबांना कंटाळा येत नाही हे कदाचित सदाभाऊ खोत यांना माहित नसावे असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी लगावला आहे. सदाभाऊ खोत यांच्या  वक्तव्याचा समाचार महेश तपासे यांनी घेत पवारसाहेबांचे सार्वजनिक जीवनातील कामाचे स्थान किती मोठे आहे याची आठवणही करून दिली आहे.