‘पवार साहेब ….हनुमान मंदिरात इफ्तार पार्टीचे आयोजन करता तर मशिदीत हनुमान चालीसा लावून दाखवा!’

पुणे – पुण्यात राष्ट्रवादी (ncp) काँग्रेसकडून हनुमान जयंतीच्या प्रसादाने मुस्लिमांचा आजचा रोजा सोडण्यात येणार आहे. पुण्यातील साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिरात संध्याकाळी इफ्तारचं (iftaar) आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रविंद्र माळवदकर(ravindra malvadkar) आणि भाई कात्रे(bhai katre) यांनी या रोजा इफ्तारचे आयोजन केलं आहे.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यासोबतच राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, पी ए इनामदार, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस आयुक्त प्रियांका नारनवरे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोयेकर देखील उपस्थित असणार आहेत.

इस्लाम धर्मातील पवित्र रमजान(ramadan) महिन्याला 3 एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. या संपूर्ण महिन्यात मुस्लिम लोक सूर्योदयानंतर आणि सूर्यास्तापूर्वी अन्न आणि पाणी घेत नाहीत. आज देशभरात रमजानचा तेरावा रोजा आहे. दरम्यान, या कार्यक्रमावर भाजपने टीकास्त्र सोडले आहे. शरद पवारांनी त्यांच्या घरात मशिदीची स्थापना करून, त्यांची घरी इफ्तार पार्टीचं आयोजन करावं, हिंदूंच्या आस्थेवर घाला घालू नका. हनुमान मंदिरात इफ्तार पार्टीचा आयोजन करता तर मशिदीत हनुमान चालीसा लावून दाखवा! असं भाजपने म्हटलं आहे.

नास्तिक शरद पवार यांच्या पक्षाकडून पुण्यातील साखळीपीर हनुमान मंदिरात इफ्तार पार्टी ठेवणार आहेत. ही कोणत्या प्रकारची नास्तिकता आहे? हा सरळ हिंदू धर्माच्या श्रध्देवर घाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा जाहीर निषेध! समस्त हिंदूंनी याचा निषेध करावा! अशी मागणी देखील करण्यात आली आहे.