‘या’ दोन प्रमुख कारणांसाठी पवार थेट मोदींना जाऊन भेटले 

नवी दिल्ली – केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील (MVA) नेत्यांच्या विरोधात कारवाई सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)  यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narenara Modi ) यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये संसदेतील पंतप्रधान कार्यालयात भेट झाली आहे.

दोघांमध्ये जवळपास 20 ते 25 मिनिटे चर्चा झाली. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आणि भाजप, केंद्रीय तपास यंत्रणा यांच्यात संघर्ष सुरू आहे.  यातच झालेल्या या भेटीमुळे राज्यासहित दिल्लीतील राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी भेटीसंदर्भातील माहिती दिली.

गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्रातील राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नियमांनुसार काम करत नाहीत, ही गोष्ट आपण पंतप्रधानांच्या कानावर घातली. तसेच खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केल्याचा मुद्दाही पंतप्रधानांसमोर मांडल्याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. संजय राऊतांविरोधात कारवाईची गरज काय? असा सवाल देखील पवार यांनी यावेळी उपस्थित केला.

विधानपरिषदेच्या प्रलंबित 12 आमदारांच्या नियुक्तीच्या प्रश्नावर पंतप्रधानांनी लक्ष घालू असं आश्वासनही दिलं असल्याची माहिती त्यांनी दिली.या दोन मुद्द्याव्यतिरिक्त पंतप्रधानांशी इतर कोणत्याही राजकीय मुद्द्यांवर चर्चा केली नसल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं.