राज्यात ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळताच राजेश टोपेंनी केले ‘हे’ आवाहन

मुंबई : वुहानमध्ये नोव्हेंबर 2019 मध्ये पहिल्यांदा सापडलेल्या नॉव्हेल कोरोनाव्हायरसपासून आतापर्यंत SARS-COV-2 ची अनेक म्युटेशन्स झाली. यातलं सर्वांत नवीन म्हणजे ओमिक्रॉन. या ओमिक्रॉनची जगणे धास्ती घेतली आहे. आता अखेर ओमिक्रॉनचा महाराष्ट्रात देखील शिरकाव झाल्याने चिंतेत भर पडली आहे.

कल्याण डोंबिवली मधील एका 33 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं याबाबत अधिक माहिती दिली आहे. ‘महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा व्हेरियंटचा पहिला रुग्ण कल्याण डोंबिवलीमध्ये सापडल्याचे प्रयोगशाळा तपासणीतून सिद्ध झाले आहे. या रुग्णाच्या १२ अति जोखमीच्या निकट सहवासितांचा आणि २३ कमी जोखमीच्या निकट सहवासितांचे कोविड अहवाल निगेटिव्ह आढळले आहेत.’ अस आरोग्य विभागाने सांगितले आहे.

या नंतर आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्यातरी कोणतेही निर्बंध लागू करण्याची गरज नसल्याचे टोपे यांनी सांगितले आहे. तर, नागरिकांनी पॅनिक होण्याची गरज नाही, नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियम पाळावेत असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

हा तरुण दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरातून मुंबईत आला होता. त्यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. जिनोमि सिक्वेन्सिंगसाठी त्याचे नमुने पाठवण्यात आले होते. त्यानंतर आज या तरुणाला ओमिक्रॉनची लागण झाल्याचं तपासणीत स्पष्ट झालं आहे.

ओमिक्रॉनची लागण झालेल्या तरुणाने कोणतीही कोविड प्रतिबंधक लस घेतलेली नाही. दि. 24 नोव्हेंबर 2021 रोजी या प्रवाशाला सौम्य ताप आला होता. अन्य कोणतीही लक्षणं आढळून आली नाहीत. त्यामुळे या रुग्णाचा आजार एकूण सौम्य स्वरुपाचा असून तो सध्या कल्याण डोंबिवली येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहे.

हे देखील पहा