स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लोकांनी भाजपला त्यांची जागा दाखवली  – जयंत पाटील

सांगली   – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लोकांनी भाजपला त्यांची जागा दाखवली. आपल्या महाराष्ट्राची ही परंपरा, वैचारिक बांधिलकी आपल्याला कायम ठेवायची आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी एकजुटीने काम करायला हवे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगली – वाळवा येथे केले.

‘एक तास राष्ट्रवादीसाठी, आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी’ या संकल्पनेतून वाळवा तालुक्यातील साखराळे येथे आयोजित बैठकीमध्ये जयंत पाटील यांनी आज कार्यकर्त्यांशी संवाद साधला.   २०१६ साली अर्थसंकल्प मांडत असताना मोदीसरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार अशी घोषणा केली. मात्र शेतकऱ्यांचे उत्पन्न तीन पटीने घटले आहे ही वस्तुस्थिती आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

कर्नाटक राज्यातील दुष्काळी भागाला मदत करण्याची घोषणा केली याचा आम्हाला आनंदच आहे. मात्र हे निर्णय तेथील निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच घेतलेले आहेत. येथील भाजपला उभारणी देण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे, हे जनता जाणते असेही जयंत पाटील यांनी सांगितले. अनेक आर्थिक संकट देशासमोर आ वासून उभी आहेत असे तज्ज्ञांचे मत आहे. बेरोजगारीचा आलेख वेगाने वर चढतो आहे. सर्वांना घरे देण्याची घोषणा मात्र स्वप्नवत राहिली आहे असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.