‘मंत्र्याचा जावई हर्बल तंबाखू पिकवू शकतो, मग शेतकऱ्यांनाही परवानगी द्या’

नांदेड : महाराष्ट्रातील देगलूरसह देशातील 30 विधानसभा आणि तीन लोकसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार येत्या 30 ऑक्टोबर रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असून 2 नोव्हेंबर रोजी या जागांचे निकाल जाहीर होणार आहेत. कॉंग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचं कोरोनाने निधन झाल्यामुळे देगलूर-बिलोली मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे.

या मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी सरळ लढत होत आहे. कॉंग्रेसकडून रावसाहेब अंतापूरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, भाजप कडून शिवसेना सोडून भाजपवासी झालेले सुभाष साबणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

साबणे यांच्या प्रचारार्थ आज विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभा घेतली. या सभेत फडणवीस यांनी महाविकास आघाडी आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचा खरपूस समाचार घेतलाय. ‘एका मंत्र्याचा जावई गांजा विकताना आढळून आला. पण मंत्री म्हणतो की ही हर्बल तंबाखू आहे. मग आमचे सदाभाऊ खोत म्हणाले की आमच्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. तुमचा मंत्री हर्बल तंबाखू पिकवू शकतो तर शेतकऱ्यांनाही हर्बल तंबाखू लावायची परवानगी द्या. म्हणजे शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील’, अशी खोचक टीका फडणवीस यांनी नवाब मलिकांवर केलीय.