तेरखेडा येथे फटाका क्लस्टर तर भूम, परंडा वाशी,शिराढोण येथे होणार एमआयडीसी; उदय सामंत यांची घोषणा

 तुळजापूर –धाराशिव जिल्ह्यातील  तेरखेडा येथे  फटाका क्लस्टर आणि भूम, परंडा वाशी व शिराढोण येथे एमआयडीसी उभारण्यात येणार आहे. जिल्ह्याचे  पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत  एक्स्प्रेस टॉवर नरीमन पॉईट मुंबई येथे झालेल्या बैठकीत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उपरोक्त घोषणा केली.

उस्मानाबाद जिल्ह्याचा चेहरा-मोहरा बदलून राज्यात तो औद्योगिक दृष्ट्या प्रगत करण्याच्या उद्देशाने हा महत्वपूर्ण निर्णय असल्याचे पालकमंत्री  तानाजीराव सावंत यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यात एमआयडीसी च्या माध्यामातून उद्योग खेचून आणत जिल्ह्यातील नागरिकांना नोकऱ्या, रोजगार व त्यामधून आर्थिक विकास  साधण्यासाठी दूरदृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असे डॉ.सावंत म्हणाले. आर्थिक विकासापाठोपाठ विविध पुरक व्यवसाय व पायाभूत सुविधांचा विस्तार करण्याचे यामागे धोरण आहे.

तेरखेड्याची  राज्यातच नव्हे तर देशामध्ये फटाका उत्पादनाच्या बाबतीत ओळख आहे . ही ओळख, स्थानिकांचे कौशल्य व या ठिकाणचा पारंपारिक व्यवसाय याचा विकास होण्यासाठीच फटाका क्लस्टरची निर्मिती करण्यात येणार आहे. या माध्यमातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार व फटाका बाजारपेठेत तेरखेड्याचे अढळ स्थान निर्माण होईल. हे निश्चितच उस्मानाबाद जिल्ह्याच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक विकासास पोषक पुरक व पुढे घेऊन जाणार याची मला खात्री आहे. असेही डॉ.सावंत यावेळी म्हणाले.