प्लॅनेट मराठी आणि क्रांती रेडकर घेऊन येत आहेत,ओटीटी प्लॅटफॉर्मवरील पहिलावहिला मराठी रिॲलिटी शो

मुंबई – निरनिराळ्या आशयावर प्रयोग करणारे ‘प्लॅनेट मराठी’ (planet marathi) पुन्हा एकदा एक नवीन संकल्पना घेऊन प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी(entertainment) सज्ज झाले आहे. लवकरच ‘प्लॅनेट मराठी’ आणि क्रांती रेडकर यांची निर्मिती संस्था ‘दॅट हॅप्पी गर्ल’ एक नवीन कल्पना घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या शोच्या निमित्ताने क्रांती रेडकर निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहेत. वर्षपूर्तीनिमित्त मनोरंजक वेबफिल्म, वेबसिरीजच्या घोषणा होत असतानाच प्लॅनेट मराठीने आणखी एक मोठी घोषणा केली आहे, ती म्हणजे रिॲलिटी शोची(reality show) . मराठी ओटीटीवर (OTT) अशा प्रकारचा प्रयोग प्रथमच होत आहे.

या शोची रूपरेखा नेमकी काय असणार, यासाठी मात्र थोडी वाट पाहावी लागणार आहे. ‘प्लॅनेट मराठी’, अ व्हिस्टास कॅपिटल कंपनी नेहमीच त्यांच्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी वैविध्यपूर्ण आशय घेऊन आले आहे, त्यामुळे हा रिॲलिटी शोही प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल.

प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, प्रथमच मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिॲलिटी शो सादर होणार आहे. क्रांती रेडकरच्या सोबतीने हा रिॲलिटी शो आम्ही प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेऊन येत आहोत. ही संकल्पना खूपच वेगळी असल्याने प्रेक्षकांसोबत आम्ही सुद्धा यासाठी खूप उत्सुक आहोत. लवकरच यातील एकेक पैलू उलगडतील.”

या शो बाबत निर्माती क्रांती रेडकर म्हणतात, पहिल्यांदाच निर्माती म्हणून काम करताना मला एका चांगल्या ओटीटीसोबत काम करायचे होते. प्लॅनेट मराठी सोबत मी ‘रेनबो’ चित्रपट केला असल्याने त्यांच्यासोबत काम करण्याचा माझा अनुभव अप्रतिम आहे. त्यामुळे ‘प्लॅनेट मराठी’ हाच मला योग्य पर्याय वाटला.

मुळात ‘प्लॅनेट मराठी’ हे खूपच दूरदर्शी आहे. प्रेक्षकांची आवड ते उत्तम जाणतात. या शोच्या निमित्ताने ‘प्लॅनेट मराठी’सोबत सुरु झालेला माझा हा नवीन प्रवास नक्कीच अविस्मरणीय असणार. विशेष म्हणजे या शोच्या माध्यमातून आम्ही अवघ्या महाराष्ट्रात पोहोचणार आहोत. यानिमित्ताने नवोदितांना एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.”