‘प्लॅनेट मराठी’ने रोवला मराठी मनोरंजनाचा झेंडा अटकेपार — ‘एक्स्पो२०२० दुबई युएई’मध्ये ‘गोष्ट एका पैठणीची’चा प्रिमिअर, ‘सहेला रे’चा टीझर लॅान्च —

मराठीतील पहिलेवहिले ओटीटी प्लॅटफॉर्म ठरलेल्या ‘प्लॅनेट मराठी’ने आपला झेंडा अटकेपार रोवला असून याचे निमित्तही तितकेच खास आहे. १९ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान दुबईमध्ये महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने ‘एक्स्पो२०२० दुबई युएई’ हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात २० नोव्हेंबर रोजी इंडियन पव्हेलियनमध्ये ‘प्लॅनेट मराठी’च्या ‘सहेला रे’ या वेबफिल्मचा टीझर लॉन्च करण्यात आला तर ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाचा प्रिमिअरही दाखवण्यात आला. या सोहळ्याला महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक विभागमंत्री श्री. अमित देशमुख आणि सचिव आय.ए.एस श्री. सौरभ विजय तसेच महाराष्ट्र शासनाच्या चित्रपट-नाटक व सांस्कृतिक विकास विभागाचे व्यवस्थापकीय संचालक आय.ए.एस श्री. कैलाश पगारे आणि संयुक्त व्यवस्थापकीय संचालक आय.ए.एस श्री. कुमार खैरे उपस्थित होते.

यावेळी अमित देशमुख यांनी प्लॅनेट मराठी ओटीटीवरील कन्टेन्टची प्रशंसा करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच मनोरंजन क्षेत्रात विविध संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही दिले.

‘विस्टास मीडिया कॅपिटल कंपनी’चे सहकार्य असलेल्या ‘प्लॅनेट मराठी’ चा जगभरात असलेल्या सर्व मराठी प्रक्षकांपर्यंत दर्जेदार आशय असलेले मनोरंजनात्मक कार्यक्रम पोहोचवण्याचा मानस आहे. याच कामगिरीमुळे प्लॅनेट मराठीला दुबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘ॲचिवर्स अवॅार्ड’ मध्ये ‘प्रॅामिसिंग रिजनल ओटीटी अवॅार्ड’ने सन्मानित करण्यात आले.

‘एक्स्पो२०२० दुबई युएई’तील सहभागाबद्दल ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे सर्वेसर्वा अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ”प्रेक्षकांना सर्वोत्कृष्ट कन्टेन्ट देण्यासाठी ‘प्लॅनेट मराठी’ नेहमीच प्रयत्नशील असते. समृद्ध आणि वैभवशाली मराठी भाषेला सातासमुद्रापार पोहोचवण्याच्या दिशेने टाकलेले हे एक पाऊल आहे. ‘एक्स्पो२०२० दुबई युएई’ सारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोहळ्यात ‘प्लॅनेट मराठी’ची निर्मिती असलेल्या ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाचा प्रिमिअर आणि ‘सहेला रे’ या वेबफिल्मचे टीझर लॉन्च होणे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या प्रत्येक चित्रपटाचा तसेच वेबसिरीजचा आशय, मांडणी खूप वेगळी असते. येथे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी मनोरंजनाचा खजिना उपलब्ध आहे. मराठी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करण्यासाठी आणि मराठी भाषा सातासमुद्रापार पोहोचवण्यासाठी ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ कायमच कटिबद्ध आहे.”

https://youtu.be/FkhUTw1OjTM

You May Also Like