…मग आता हे लोकं गुरु गोविंद सिंग यांना पंजाबमधून बाहेर काढणार का?, मोदींचा हल्लाबोल

नवी दिल्ली : पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी एका प्रचारसभेत विरोधकांना टीका करताना म्हणाले की, प्रियांका गांधी याही पंजाबी आहेत आणि त्या पंजाबच्या सून आहेत. पंजाबी एक व्हा, आम्ही यूपी, बिहार आणि दिल्लीचे ज्यांना पंजाबमध्ये राज्य करायचे आहे, त्यांना आम्ही येऊ देणार नाही. चन्नी असे सांगत असताना प्रियांका गांधी या व्हिडिओमध्ये टाळ्या वाजवताना दिसत आहेत. आता याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या ‘युपी बिहार’ च्या मुद्यावर दिल्ली परीवार टाळ्या वाजवत होता. हे देशातील सगळ्या लोकांनी पाहिले आहे. गुरु गोविंद सिंग यांचा जन्म कुठे झाला? बिहार, पाटणा साहिबमध्ये. आता मग हे लोकं गुरु गोविंद सिंग यांना पंजाबमधून बाहेर काढणार का? अशा फुटीरतावादी मानसिकतेच्या लोकांना पंजाबवर क्षणभरही राज्य करू देऊ नका, असा हल्ला बोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर केला आहे.

यावेळी मोदींनी गुरु रविदासांचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, या दलित गुरूंची बुधवारी जयंती होती. आमच्या पक्षातील विविध नेत्यांनी आपला निवडणूक प्रचार आटोपून मंदिरात जाऊन गुरु रविदासांचे स्मरण केले. आम्ही कालच संत रविदास जयंती साजरी केली, त्यांचा जन्म कुठे झाला होता. उत्तर प्रदेश की वाराणसीमध्ये. मग तुम्ही संत रविदासांना पंजाबमधून हटवणार शकाल का? असा सवालही त्यांनी केला.

कॉंग्रेसच्या या वक्तव्याचा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील निषेध व्यक्त केला आहे ते म्हणाले की, हे लज्जास्पद आहे. कोणत्याही व्यक्ती किंवा विशिष्ट समुदायाला लक्ष्य करून केलेल्या टिप्पण्यांचा आम्ही तीव्र निषेध करतो. तर देशातील इतर राजकीय नेत्यांनी देखील चरणजीत सिंग चन्नी यांच्या वर निशाणा साधला.