मोदींचे ट्विटर अकाउंट हॅक झाल्यानंतर ट्विटरचे स्पष्टीकरण, तपासात काय आढळले?

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वैयक्तिक ट्विटर खाते हॅक करण्यात आले आहे (PM Modi Twitter Account Hack). रविवारी पहाटे पीएमओने ही माहिती दिली. वास्तविक, पंतप्रधान मोदींचे ट्विटर हँडल हॅक करून दोन ट्विट करण्यात आले आहेत. ज्यामध्ये असा दावा करण्यात आला होता की, ‘भारताने बिटकॉइनला अधिकृतपणे कायदेशीर मान्यता दिली आहे. मात्र, नंतर दोन्ही ट्विट डिलीट करण्यात आले.

या संपूर्ण प्रकरणावर ट्विटरने एक निवेदन जारी केले आहे. कंपनीने म्हटले आहे की, पीएम मोदींच्या खात्यातील उल्लंघनाची माहिती मिळताच आम्ही लगेच सक्रिय झालो. खाते सुरक्षित करण्यासाठी तातडीने आवश्यक पावले उचलण्यात आली आहेत. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, आमच्याकडे पंतप्रधान कार्यालयाशी चर्चेसाठी २४ तास लाइन सुरू आहे. आमच्या आतापर्यंतच्या तपासात असे दिसून आले आहे की यावेळी इतर कोणत्याही खात्यावर परिणाम झाल्याचे कोणतेही संकेत नाहीत.

12 डिसेंबर रोजी हॅकर्सनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाउंट हॅक केले. ज्यामध्ये बिटकॉइनबाबत ट्विट करण्यात आले होते. मात्र, नंतर ते लगेच हटवण्यात आले. पीएमओने ट्विट करून नरेंद्र मोदींचे खाते काही काळासाठी हॅक झाल्याची माहिती दिली. या कालावधीत केलेल्या कोणत्याही ट्विटकडे दुर्लक्ष करण्यात यावे, अशी माहिती पीएमओकडून देण्यात आली.

दरम्यान, सोशल मीडियावर हा स्क्रीनशॉट शेअर करून अनेक यूजर्स हैराण झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाऊंट कधी हॅक होऊ शकते, हे सुरक्षेला गंभीर धोका आहे, असा प्रश्न अनेक वापरकर्त्यांनी उपस्थित केला आहे. याआधी सप्टेंबर 2020 मध्ये देखील अज्ञात हॅकर्सच्या एका गटाने पीएम मोदींची वैयक्तिक वेबसाइट आणि मोबाइल अॅप हॅक केले होते.