मुस्लिम महिलांवर कोणीही अत्याचार करू शकत नाही, यासाठी..; नरेंद्र मोदी यांचे जनतेला आश्वासन

सहारनपुर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले. त्यावेळी त्यांनी डबल इंजिन सरकार करत असलेली विकासकामे सुरू ठेवण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे सरकार येणे अत्यंत आवश्यक आहे. याकाळात उत्तर प्रदेशमध्ये चौपदरीकरणापासून उद्योगांपर्यंत झपाट्याने विकास झाला आहे, असं त्यांनी म्हटलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, उत्तर प्रदेश जो विकास करणार आहेत त्यांनाच जनता मतदान करणार आणि हे इथल्या जनतेनेच ठरवलं आहे. जे सरकार गुन्हेगारांना कडक शिक्षा देऊन तुरुंगात डांबतात, त्यांना आम्ही मतदान करू, असा निर्धार जनतेने केला आहे. आम्हाला ऊस उत्पादक शेतकऱ्यांची शक्ती वाढवायची आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्रास होणार नाही. यासाठी आम्ही विशेष काळजी घेणार आहोत. पूर्वीच्या सरकारमध्ये दंगली होत असत, परंतु भाजपचे सरकार आल्यानंतर राज्य दंगलमुक्त झाले आहे. त्यामुळे राज्य दंगलमुक्त ठेवणाऱ्यांना मतदान करा.

आजकाल एका घराण्यातील पक्ष एकामागून एक खोटी आश्वासने देत असल्याचे मी पाहत आहे. सत्ता त्यांच्या नशिबात लिहिलेली नसते. कारण त्यांना माहिती आहे की, उत्तर प्रदेशमधील जनतेने त्यांना नाकारले आहे. जेव्हा कोणी इतकी मोठी आश्वासने देतात. त्यांची आश्वासने ही पोळकच ठरतात. कोरोनासारख्या महामारीमध्ये कोणत्याही गरीबाला उपाशी झोपू दिलं नाही. आज उत्तर प्रदेशमधील लोकांना मोफत रेशनचा लाभ मिळत असल्याचं त्यांनी सांगितले.

मोदी बोलताना पुढे म्हणाले की, आम्ही मुस्लिम भगिनींना तिहेरी तलाकच्या अत्याचारातून मुक्त केले आहे. मुस्लिम भगिनींना सुरक्षितता मिळावी यासाठी तिहेरी तलाक कायदा लागू करण्यात आला आहे. मात्र मुस्लिम भगिनी भाजपचे गुणगान करू लागल्याने काही मतांचे ठेकेदार अस्वस्थ झाले. त्याच्या पोटात दुखू लागले. मुस्लीम भगिनी आणि मुलींचे हक्क रोखण्यासाठी नवनवीन मार्ग शोधले जात आहेत. मुस्लिम महिलांवर कोणीही अत्याचार करू शकत नाही, यासाठी योगी सरकार गरजेचे आहे. आपणही विकास करतो आणि आपल्या वारशाचाही तितकाच अभिमान असल्याचे ते म्हणाले.