पुणे महापालिकेकडून मिळकत कराची दामदुपटीने वसुली, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघातर्फे जाहीर निषेध

पुणे : पुणे महापालिकेने मिळकत कराची वसुली दामदुपटीने सुरू केली असून शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असलेल्या अनेक व्यापारी व व्यावसायिकांना त्यासंदर्भात नोटीसा आल्या आहेत. पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघातर्फे या वसुलीचा जाहीर निषेध करीत असून ती तत्काळ थांबविण्यात यावी, अशी मागणीही त्यांच्या वतीने करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी दिली.

मिळकत वसुलीची पद्धत पाहिली तर, आश्चर्याचा धक्का बसेल. थकलेल्या मिळकत करावर महिन्याला दोन टक्के याप्रमाणे वार्षिक 24 टक्के व्याज आकारून वसुली सुरू आहे. महापालिकेकडून तशा नोटीसा आल्या आहेत. महापालिका प्रशासनाचा हा प्रकार क्रूरतेचा कळस आहे. महापालिका निर्दयपणे वागत आहे. व्यापारी रितसरपणे मिळकत भरायला तयार आहेत. परंतु, गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे दुकाने बंद राहिली आहेत. व्यवसाय ठप्प राहिला होता. अशा परिस्थितीत व्यापाऱ्यांना मदत करायची सोडून त्यांना नाहक त्रास कसा वाढेल अशी धोरणं आखली जात आहेत. मिळकत कराची अशी दामदुपटीने वसुली करणे हा त्याचाच प्रकार आहे, असेही सचिन निवंगुणे म्हणाले.

महापालिका प्रशासन आणि सर्व पक्षांचे पदाधिकारी यांना विनंती आहे की, त्यांनी व्यापाऱ्यांची परिस्थिती लक्षात घ्यावी. आता कुठे व्यवसाय सुरू होत आहेत. त्यामुळे जाचक वसुली रद्द करून रितसर नियमित कर घ्यावा. त्यातही तीन ते चार टप्पे करून तो घेण्यात यावा. महापालिकेलादेखील पैशांची आवश्यकता आहे. व्यापारी पण कर भरतील. आपण सर्वजण मिळून मध्यम मार्ग काढावा, असेही सचिन निवंगुणे म्हणाले.

हे ही पहा: