जातीपातीत… धर्माधर्मात… समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचं राजकारण केले जात आहे – राष्ट्रवादी

मुंबई – ७० वर्षात जे झाले नाही ते आम्ही करुन दाखवू म्हणणार्‍या भाजपने ( BJP ) महागाईच्या रुपाने जनतेला करुन दाखवले आहे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे ( Mahesh checks ) यांनी लगावला आहे. देशात होलसेल प्राईज (WPI) महागाईने ३० वर्षात उच्चांक गाठला आहे. अच्छे दिनाचे स्वप्न जनतेला दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र आज महागाईमुळे लोकांचे दरडोई उत्पन्न कमी झाले आहे. वाढती महागाई लपवण्यासाठी जातीय तणाव निर्माण करण्याचे षडयंत्र रामनवमी ( Ramanavami ) आणि हनुमान जयंतीच्या ( Hanuman Jayanti ) निमित्ताने करण्यात आल्याचा संशय महेश तपासे यांनी व्यक्त केला आहे.

जातीपातीचे… धर्माधर्मात… समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचं राजकारण केले जात आहे. सर्वसामान्यांचे महागाईने कंबरडे मोडले असताना महागाई कमी करण्यासाठी सरकारचे काय नियोजन आहे याबाबत पंतप्रधानांनी माध्यमांशी बोलावे असा सल्लाही महेश तपासे यांनी दिला आहे.

पवारसाहेबांना ‘आप’ च्या प्रदेशाध्यक्षांनी पत्र दिले असून त्या पत्रात देशात जे धार्मिक द्वेषाचे ध्रुवीकरणाचे राजकारण सुरू आहे त्याविरोधात पवारसाहेबांनी आवाज उठवावा अशी मागणी केली आहे. त्या पत्राचे महेश तपासे यांनी स्वागत केले आहे. धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र यावे, त्यांचे हात बळकट व्हावे आणि संविधानाचे रक्षण केले पाहिजे ही भूमिका पवारसाहेबांनी सुरुवातीपासून घेतली आहे असेही महेश तपासे म्हणाले.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममतादीदी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि कॉंग्रेसनेही या मागणीला साथ दिली आहे. आता देशात भाजप विरोधी संघटना निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे देशात युपीएचे सरकार यायला तो दिवस लांब नाही असेही महेश तपासे यांनी स्पष्ट केले.

एसटी कर्मचाऱ्यांकडून कोट्यवधी रुपये गोळा करून अलिशान गाड्या आणि मालमत्ता सदावर्ते यांनी गोळा करत भोळ्या भाबड्या एसटी कर्मचाऱ्यांच्या भावनांचा खेळ केला आहे असा आरोप महेश तपासे यांनी केला आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी राज्यातील ९० हजार एसटी कर्मचाऱ्यांना सरकारमध्ये विलिनीकरण करुन देतो सांगून प्रत्येकी रकमा गोळ्या केल्या आहेत. ते पैसे एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी किंवा जे आंदोलनात मयत झाले त्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सदावर्ते यांनी द्यायला हवे होते असेही महेश तपासे म्हणाले.

शिवाय सदावर्ते यांच्या घरी पैसे मोजण्याची मशीनही सापडली आहे. सदावर्ते यांच्या घराच्या गच्चीवर पवारसाहेबांच्या घरावर हल्ला करण्याअगोदर बैठका झाल्याचे तपासात उघड झाले आहे. एकंदरीतच गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे उकळण्याचे काम केल्याचा आरोपही महेश तपासे यांनी केला आहे.