पुनम महाजन ‘त्या’ व्यंगचित्रावर भडकल्या, संजय राऊतांनी ट्वीट केले डिलीट

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसैनिकांशी संवाद साधला. या संवादामध्ये हिंदुत्त्वाच्या मुद्यावरुन उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली होती.यानंतर  भाजपकडून माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर दिलं.

भाजपतर्फे झालेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी शिवसेनेकडून संजय राऊत पुढे आले. संजय राऊत यांनी देखील शिवसेना राम मंदिर आंदोलनात कुठं होती. राम मंदिराराच्या लढाईत शिवसेना नव्हती तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आरोपी कसं करण्यात आलं?, असा सवाल केला होता. संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी भाजपला उत्तर देताना एक व्यंगचित्र ट्विट केलं होतं. संजय राऊत यांनी एक व्यंगचित्र शेअर केलं आहे. या व्यंगचित्रात बाळासाहेब ठाकरे एका चित्रावर बसले असून त्यांनी दुसऱ्या खुर्चीवर पाय ठेवले आहे. तसंच बाजूला एक स्टूलही आहे.

त्यावेळी तिथे भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन उभे असतात. बाळासाहेब त्यांना ‘Have a Seat’ म्हणून बसण्यास सांगतात. असं या व्यंगचित्रात दाखवण्यात आलंय. हे व्यंगचित्र शेअर करताना ‘कोण कुणामुळे वाढले? उघडा डोळे.. बघा नीट’ असं कॅप्शन दिलं होतं.संजय राऊत यांनी नंतर ते ट्विट डिलीट केलं मात्र भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी  जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “स्वर्गीय बाळासाहेब व स्वर्गीय प्रमोदजी, या दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी युती केली होती. नामर्दांसारखे कार्टून दाखवू नका”, अशा शब्दात पूनम महाजन यांनी संजय राऊत यांना उत्तर दिलं आहे.