मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक करत अभिनेत्री गौहर खान, म्हणाली…

मुंबई : महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडी सरकारवर (MVA) राजकीय संकटाचे ढग दाटले आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बंडखोर झाल्याने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकार संकटात सापडले आहे. शिंदे यांची बंडखोर वृत्ती पाहता शिवसेनेने त्यांना विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हटवले असले तरी या निर्णयांमुळे एकनाथ शिंदे हे कोणत्याही दबावाखाली दिसत नाहीत.

गुवाहाटी येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी गुरुवारी एकनाथ शिंदे यांची नेता म्हणून निवड केली. यासोबतच विरोधी विचारसरणीच्या पक्षांशी युती केल्यामुळे गेल्या अडीच वर्षांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना केडरकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप बंडखोर आमदारांनी केला.सोबतच खासदार संजय राऊत यांची लुडबुड या सर्व कारणांमुळे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड पुकारले आहे.

दरम्यान, या सगळ्यात अभिनेत्री गौहर खानने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत उद्धव ठाकरे यांचं कौतुक केले आहे. गौहरने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. एकता, सहिष्णुता, सर्वसमावेशकता, राज्याची प्रगती याचं उत्तम उदाहरण मांडणारा नेता म्हणजे उद्धव ठाकरे, असं गौहर मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं आहे.