Prakash Ambedkar : ज्या प्रमाणे आपण समाजाच्या मेळाव्यात उपस्थित राहतो, त्या प्रमाणे ओबीसी मेळाव्याला सुद्धा उपस्थित राहायला पाहिजे. 7 तारखेच्या औरंगाबाद येथील सभेला जर तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहिला तर तो ओबीसींचा राजकीय चेहरा असेल, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आरक्षण बचाव यात्रेच्या दरम्यान सोलापूर येथील सभेत व्यक्त केले.
सर्व ओबीसी नेत्यांनी चर्चा करायला पाहिजे की, आरक्षणाच्या बाबतीत भाजपची भूमिका काय आहे? त्यांचा जरांगे पाटील यांना पाठिंबा आहे की विरोध आहे? असे सवालही त्यांनी उपस्थित केले.
ॲड. आंबेडकर पुढे म्हणाले की, भीतीतून बाहेर यायचे असेल, तर संघटित होणे गरजेचे आहे यातून ताकद दिसते. 7 तारखेला औरंगाबाद येथील जाहीर सभेला सर्व ओबीसींनी स्वतःच्या वाहनाने आले पाहिजे. हे जर ओबीसी करू शकले नाहीत, तर आमच्यासारखे कितीही आले तरी तुमचं आरक्षण वाचवू शकणार नाहीत. निवडणुका होईपर्यंत कोणताही पक्ष आरक्षणाच्या प्रश्नावर भूमिका मांडणार नाही. ओबीसींना स्वतःचा लढा स्वतःच लढायचा आहे हे लक्षात घ्या.
ॲड. आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावर देखील निशाणा साधला. ते म्हणाले की, शरद पवार हे राजकीय नेते नाहीत, तर एका समाजाचे नेते आहेत. त्यामुळे ते समाजाच्या बाजूनेच उभे राहतील.
मनोज जरांगे हे देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत आहेत. पण भाजप त्यांना विरोधही करत नाही आणि समर्थन सुद्धा देत नाही. पण भाजपचा त्यांच्या मागण्यांना छुपा पाठिंबा आहे. यामध्ये ओबीसींना फसवलं जात आहे. देवेंद्र फडणवीस यांना पुढं करून असे सांगितले जात आहे की, हाच आपला तारणकर्ता अशा प्रकारे ओबीसींची फसवणूक होत असल्याचेही ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप