“भाजप आणि मित्रपक्षांसोबत आमचं…”, शिंदे गटासोबतच्या युतीबद्दल स्पष्टच बोलले प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar Press Conference: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची काल गुप्त बैठक झाली. वर्षा बंगल्यावर काल अडीच तास त्यांची गुप्त बैठक चालली. बंद दाराआड प्रकाश आंबेडकर आणि एकनाथ शिंदेंमध्ये काय चर्चा झाली? त्यांनी युतीबद्दल काही बातचीत केली का? याकडे सर्वांचे लक्ष होते. अखेर आता प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत या चर्चांवर पूर्णविराम लावला आहे.

माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काल भेट झाली. यावेळी बऱ्याच गोष्टी चर्चेत आल्या. पण पक्षाची आमची जी भूमिका आहे ती ठाम आहे. भाजप ज्या पक्षासोबत आहे, त्या पक्षासोबत युती करायची नाही हे आमचं ठरलेलं आहे. आम्ही अशा पक्षांसोबत कधी गेलो नाही. याची जाणीव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही आहे. विरोधकांचा विरोधक आपला मित्र हे सूत्रं राजकारणात असतं.”

“पण आमचं भाजप आणि संघासोबत व्यवस्थेचं भांडण आहे. जी व्यवस्था आम्ही उद्ध्वस्त केली. तीच भाजप आणू पाहत आहे. त्यामुळे आम्ही भाजप सोबत युती न करण्याचा निर्णय घेतला आहे. हे आमचं तात्त्विक भांडण आहे”, असं आंबेडकर म्हणाले.

“आम्हाला शिवसेनेसोबत युती करायची आहे. त्यावर आम्ही ठाम आहोत. शिवसेनेसोबतच निवडणुका लढवायच्या आहेत. त्यात बदल होणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्याबाबत सांगितलं आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. तसेच शिवसेनेसोबतच्या युतीबाबत अधिकृत घोषणा कधी करायची हे उद्धव ठाकरेच ठरवतील”, असेही प्रकाश आंबेडकरांनी सांगितले.