राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय हा द्वेष भावनेतून घेण्यात आला –  प्रकाश आंबेडकर   

Rahul Gandhi :  सूरत न्यायालयाने गुरुवारी (23 मार्च) वायनाडमधील काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना ‘मोदी’ आडनावाबाबत बदनामी प्रकरणात दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. हा निकाल देताना न्यायालयाने राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवले आहे.  यातच आता राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली आहे. यामुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील कोलार येथे एका सभेत राहुल गांधी म्हणाले होते की सर्व चोरांचे आडनाव मोदी का आहे? या कमेंटवरून बराच गदारोळ झाला होता. त्यानंतर भाजपचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी या टिप्पणीवर मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे. राहुल गांधींचे वक्तव्य संपूर्ण मोदी समाजाचा अपमान करणारे असून संपूर्ण मोदी समाजाची बदनामी करणारे आहे, असे म्हटले होते.

दरम्यान, या सर्व घडामोडींवर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची प्रतिक्रिया आली आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय हा द्वेष भावनेतून घेण्यात आला आहे.असं त्यांनी म्हटले आहे. सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. तसेच उच्च न्यायालयात अपील करण्याची मुभा दिलेली आहे. राहुल गांधी यांनी जाहीर केलेले आहे ते अपील करणार आहेत. असे असताना भाजपच्या सरकारने तातडीने त्यांची खासदारकी रद्द करणे चुकीचे आहे. आम्ही त्याचा निषेध करतो. सरकारने किमान उच्च न्यायालयाय ती ऑर्डर रद्द करते का याची वाट बघायला पाहिजे होती. उच्च न्यायालयाने ऑर्डर रद्द नसती केली तर सरकारने आपला अधिकार वापरला असता तर योग्य झाले असते. मात्र आता केवळ द्वेष भावना असल्याचे याठिकाणी दिसत आहे. असं ते म्हणाले.