प्रकाश आंबेडकरांनी निवडणुकीत एक हजार कोटी घेतले; शिवसेनेच्या आमदाराचा गंभीर आरोप

हिंगोली – आमदार संतोष बांगर हे नेहमीच वादग्रस्त वक्तव्य  करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असतात. आता त्यांनी वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांनी एक हजार कोटी रुपये घेऊन हेलिकॉप्टरने प्रचार केला. याचा फायदा भाजपला झाला. वंचित ही भाजपची बी टीम असल्याचा आरोप संतोष बांगर यांना शिवसंपर्क मेळाव्यात केला.

ते म्हणाले, गेल्या निवडणुकीत प्रचारासाठी त्यांनी हेलिकॉप्टरने प्रवास करत सभा घेतल्या. कुठून हे हेलिकॉप्टर आले हे सुद्धा लोकांना सांगावे लागणार आहे. भाजपने मत विभाजित करण्यासाठी एमआयएमला पुढं केले. गेल्या निवडणुकीत आंबेडकरांच्या वंचितचाही त्यासाठीच वापर केला गेला. त्यासाठी एक हजार कोटी रुपये दिल्याचा गौप्यस्फोट बांगरांनी यावेळी केला.

आंबेडकर हे आपल्या बौद्ध समाजाला ताकद दाखवायची म्हणाले होते. ते कुणाच्या भरोशावर?, म्हणाले होते, असा सवालही बांगरांनी यावेळी उपस्थित केला. दरम्यान, या गंभीर आरोपांमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जवळा बाजार येथील शिव संपर्क अभियान अन्तर्गत आयोजित सभेमध्ये बोलताना त्यांनी आरोप केला.