आगामी मंत्रिमंडळ विस्तारात प्रणिती शिंदे याचं मंत्रिपद फिक्स ? 

सोलापूर : राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार स्थापन होऊन अडीच वर्षे लोटली असून आता खांदेपालट होण्याबाबत आता चर्चा सुरु झाली आहे.  महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात चालू महिन्यात मोठे फेरबदल होणार आहेत अशी माहिती समोर येत आहे.आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारकडून मोठे फेरबदल केले जातील अशी शक्यता आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहखात्यावरुन शिवसेना (Shiv Sena) नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. निधीवाटपावरुन शिवसेना आणि काँग्रेसचे (Congress) आमदार उघडपणे जाहीर व्यासपीठावर नाराजी व्यक्त करत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल नसल्याचं बोललं जात आहे.  यामुळेच आता मंत्रिमंडळ विस्तारातून काहीप्रमाणात नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackrey) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात महत्वाची बैठक होणार असल्याचीही माहिती मिळत आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर आता काही तरुण आमदारांची मंत्रीपदी देखील वर्णी लागू शकते अशी चर्चा आहे. यात सोलापूर शहर मध्य मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांची वर्णी लागू शकेल असं सांगण्यात येत आहे. सोलापूर जिल्हा हा एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता मात्र आता कॉंग्रेसचा या जिल्ह्यात प्रभाव म्हणावं तसा राहिलेला नाही. यामुळेच शिंदे यांना मंत्रिपद देवून जिल्ह्यात पुन्हा कॉंग्रेस बळकट करण्याचा प्रयत्न करेल असं सांगण्यात येत आहे.

दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीला भाजपकडून खिंडीत पकडले जात असताना काही जुन्या जाणत्या नेत्यांना देखील मंत्रिमंडळात समाविष्ट केले जाऊ शकते असे समजते. तर काही निष्क्रिय मंत्र्यांना नारळ देखील दिला जाऊ शकतो असा देखील अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.