‘महानगरपालिका निवडणुकीतही चंद्रकांत पाटील कोल्हापूरातून उमेदवार आयात करतात की काय अशी चर्चा सुरू आहे’

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या( Pune Municipal Corporation) आगामी निवडणुकीसाठी बहुप्रतिक्षित प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा प्रकाशित झाला. त्यानंतर पुण्यात आता राजकीय वातावरण तापायला सुरवात झाली आहे. पुण्यात आता खरी लढत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमधेच असल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, पुण्यात भाजपचे 16 नगरसेवक (BJP Corporators) राष्ट्रवादीत (NCP)प्रवेश करणार असा खळबळजनक दावा पुण्याचे राष्ट्रवादीचे शहराध्य प्रशांत जगताप यांनी केला आहे. भाजपच्या नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी चर्चा झाली असाही दावा जगताप यांनी केला आहे

यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रशांत जगताप यांचा दावा खोदून काढत त्यांना जोरदार टोला लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे २६ नगरसेवक भाजपात येत आहेत असा दावा मी पण करू शकतो, पण खोटे दावे करण्याची मला सवय नाही. त्यामुळे राष्ट्रवादीने कितीही दावे केले तरी घोडा मैदान जवळ आहे, काय होतंय ते पाहू. असा घणाघात चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

त्यावर आता प्रशांत जगताप यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक भाजपात जाण्याबाबत चंद्रकांत पाटलांनी केलेलं वक्तव्य हास्यास्पद आहे. उलट महानगरपालिका निवडणुकीतही चंद्रकांत पाटील कोल्हापूरातून उमेदवार आयात करतात की काय अशी चर्चा सुरू आहे.’ असा चिमटा प्रशांत जगताप यांनी चंद्रकांत पाटलांना काढला आहे.