स्वाभिमानी बाण्याने वर्षा बंगला सोडणारे ठाकरे इतिहासात नेहमीच उजवे ठरतील – राष्ट्रवादी 

मुंबई  – महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडी सरकारवर राजकीय संकटाचे ढग दाटले आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे बंडखोर झाल्याने उद्धव ठाकरे सरकार संकटात सापडले आहे. शिंदे यांची बंडखोर वृत्ती पाहता शिवसेनेने त्यांना विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हटवले असले तरी या निर्णयांमुळे एकनाथ शिंदे हे कोणत्याही दबावाखाली दिसत नाहीत.

उद्धव ठाकरे यांचं सरकार संकटात आल्यावर आता त्यांच्यावर चौफेर टीका होत असल्याचं दिसून येत आहे. इतकं मोठं बंड झाल्यावर त्यांनी सत्ता सोडायला हवी अशीही चर्चा सुरू आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपले शासकीय निवासस्थान देखील सोडले आहे.

यावर आता राष्ट्रवादीचे नेते प्रशांत जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले,सत्ता गेल्याच्या संतापात वर्षा बंगल्याच्या भिंती रंगवणाऱ्या फडनवीसांपेक्षा शिवसैनिकांच्या प्रचंड गर्दीत, फुलांचा वर्षाव झेलत स्वाभिमानी बाण्याने वर्षा बंगला सोडणारे ठाकरे इतिहासात नेहमीच उजवे ठरतील..! आता जे दिसताय ते चिल्लर प्यादे आहेत, या पटकथेच्या मुख्य खलनायकाची एंट्री अजून बाकी आहे. खलनायक तर संपूर्ण महाराष्ट्राला परिचितच आहे. असं जगताप म्हणाले आहेत.