‘सत्ताधाऱ्यांना फडणवीसांबद्दल किती पोटशूळ आहे हे रोज आपल्याला बघायला मिळते’

मुंबई : परमबीर सिंह फरार आहेत, असे शरद पवार म्हणतात, पण ज्यांची चौकशी सुरु आहे ते देशमुखही फरार आहेत. त्याच्यावर सोयीने आपण भाष्य केलेले नाही, असा पलटवार विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शरद पवार यांच्यावर केला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे परमबीर सिंह फरार आहेत असं नुकतेच शरद पवार म्हणाले होते. त्यावर दरेकरांनी पवारांना प्रत्युत्तर दिले आहे.

तर, देवेंद्र फडणवीस यांना अजून वाटत नाही की, मी मुख्यमंत्री अजून नाही. या गोष्टींचे विस्मरण त्यांना होत नाही हे कमालीचे आहे. मी फडणवीस यांचे अभिनंदन करतो असा उल्लेख पवार यांनी केला. त्याला प्रत्युत्तर देताना दरेकर म्हणाले की, कोणत्याही मुख्यमंत्र्यांना आपण मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामाचं विस्मरण होता कामा नये. यात या पदाचा मोठेपणा सांगण्याचा प्रयत्न होता, तो मिरविण्याचा नाही. त्यामुळे केवळ सत्ताधारी पक्षातील नेत्यांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल किती पोटशूळ आहे हे रोज आपल्याला बघायला मिळते.

दरम्यान, यावर मलिक यांनी वक्तव्य करणे ठिक आहे, पण पवार साहेब यांनीही आपण चार वेळा मुख्यमंत्री होतो ही आठवण करुन द्यावी लागते. हे सत्ताधा-यांमधील पोटशूळ आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी त्या काळात अतिवृष्टीमुळे उध्दवस्त झालेल्या शेतक-यांनी उत्तम मदत मिळवून दिली. त्यामुळे फडणवीस हे विरोधी पक्ष नेते असले तरीही आजही राज्यातील जनतेचा त्यांच्यावर विश्वास आहे.

ते विरोधी पक्ष नेते म्हणूनच सत्ताधारी नेत्यांपैकी यशस्वी आहेत व राज्यातील जनतेच्या प्रश्नाला न्याय देण्याचे काम ते करीत आहेत. ५ वर्षांच्या काळात महाराष्ट्राच्या विकासाचे प्रगल्भ नेतृत्व फडणवीस यांनी केले आहे व आजही लोकाभिमुख नेतृत्व म्हणून त्यांची छबी उभी राहिली आहे. त्यामुळेच काही लोकांना पोटशूळ होत आहे व वेदना होत आहेत असा टोलाही दरेकर यांनी यावेळी लगावला.

हे देखील पहा