मुंबई : ड्रग्जचा विळखा महाराष्ट्राला पडतोय, तरुण व्यसनाधीन होतोय यावर पवार साहेबांसारख्या जेष्ठ नेत्याने चिंता व्यक्त करायला पाहिजे. त्यादृष्टीने राज्याची असो किंवा केंद्राची तपास यंत्रणा चांगला तपास करत असेल तर पवार साहेबांनी त्या यंत्रणांची पाठ थोपटायला पाहिजे. परंतु नवाब मलिक ड्रग्ज तस्करांची बाजू घेऊन आपल्याच तपास यंत्रणाना बदनाम करत असतील तर ते थांबवण्याची सूचना पवार साहेबांनी त्यांना द्यायला पाहिजे होता. परंतु पवार साहेबांच्या अशा वक्तव्यामुळे ड्रग तस्करांच्या कारवायांना बळ मिळाल्याचे दिसून येते. राष्ट्रवादीचे नेते तपास यंत्रणांच्या विरोधात बोलतात आणि तरुण व्यसनाधीन होऊ नयेत यासाठी ड्रग तस्करांच्या विरोधात जर भाजपचे नेते बोलत असतील तर ते काय चूक करत आहेत, असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला आहे.
पवारसाहेब म्हणाले, चीनबरोबरची चर्चा १३ वेळेला अपयशी ठरतेय. जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर अफगाणिस्तानच्या प्रश्नामुळे उलथापालथ झाली आहे. त्याचे काही परिणाम हे भरतालाही भोगावे लागतील. परंतु भारत कोणाच्याही दबावाला बळी पडत नसल्यामुळेत काही देशांबाबतच्या बैठका यशस्वी झाल्याचे दिसत नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत आणि केंद्र सरकार भारतासाठी जो योग्य मार्ग असेल तो मार्ग काढल्यावचून राहणार नाही असा ठाम विश्वासही दरेकर यांनी व्यक्त केला.
राज्य सरकारचा मुख्य आक्रोश आहे की, ज्या तपास यंत्रणा आहेत त्यांचा केंद्र सरकारकडून गैरवापर होत आहे. उलट तपास यंत्रणा चांगले काम करत आहेत म्हणून त्यांचे अभिनंदन केले पाहिजे पण टीका केली जाते. वाझेचे धागेदोरे शोधून काढल्यामुळे राष्ट्रवादीच्या गृहमंत्र्याला राजीनामा द्यावा लागला आणि त्यातूनच अशा प्रकारची टीका दुर्दैवाने होत आहेत. या सर्व गोष्टी न्यायालयाच्या अखत्यारीत आहेत. न्यायालयात सादर केलेल्या पुराव्याच्या आधारे हा सर्व तपास सुरू आहे. म्हणून या तपासावर टीका करणे उचित नाही.
माजी गृहमंत्र्यांची अनेक वेळा पाठराखण केली गेली. सर्वोच्च न्यायालयात देशमुख गेले तरी त्यांची बाजू तिथे लंगडी ठरली. म्हणून देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला असे स्पष्ट करतानाच दरेकर यांनी सांगितले की, लखीमपूरच्या घटनेचे कोणीही समर्थन केलेले नाही. कायद्याला अभिप्रेत असलेली कारवाई करण्यात येत आहे. हे प्रकरणही न्यायालयात आहे. योगी सरकारने कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. तरीही केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा मागितला जातोय. मग नवाब मलिक यांच्या जावयाला जेव्हा ड्रग्जच्या प्रकरणात अटक झाली मग त्या प्रकरणात नवाब मलिक यांच्या मंत्रपदाचा राजीनामा आम्ही मागावा का, असा सवालही दरेकर यांनी उपस्थित केला.
हे देखील पहा
https://www.youtube.com/watch?v=-oKz-KhwmvA&t=4s