‘हात तोडण्याची भाषा करणाऱ्या सुप्रिया सुळेंवर पोलिसांनी कारवाई करावी’

मुंबई – महागाईच्या मुद्यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smruti Irani) यांच्या भेटीचा आग्रह धरणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांवर पुण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी हात उगारला. पक्ष किंवा राजकीय विचार काहीही असो; पण महिलांचा अवमान कोणत्याच परिस्थितीत सहन करणार नाही. कुठल्याही पक्षाच्या महिलेवर हात उगारला तर हात तोडून त्याच्या हातात देईन, असा इशारा सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंगळवारी महागाई विरोधात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी खासदार सुळे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, भाजपच्या एका नेत्याने महिलेवर हात उगारला. ही आपली संस्कृती आहे का? यापुढे जर असा कुठेही प्रकार झाला तर आपण स्वत: पुढे येऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करू. महिलांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. ही प्रवृत्ती कुठेतरी थांबायला हवी. कायद्याने आपण न्याय मागणार आहोत. जोपर्यंत त्या तिघांना शिक्षा होत नाही, तोपर्यंत आम्ही थांबणार नाही, असं त्या पुढे म्हणाल्या.

दरम्यान, सुळे यांच्या या वक्तव्याचा भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी समाचार घेतला आहे. पुणे येथील स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात पोलिसांसमोर राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या आतमध्ये गेल्या. भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांना कल्पना दिली. परंतु, पोलिसांनी कानाडोळा केला. यावरून सरकार पुरस्कृत दहशतवाद राष्ट्रवादी, शिवसेना करू पाहात आहे, असा आरोप दरेकर ( Pravin Darekar on supriya sule ) यांनी केला. तसेच, सुप्रिया सुळे हात तोडण्याची भाषा करत आहेत. पोलिसांनी याची चौकशी करून कारवाई केली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. भूमिका घ्यायची असेल तर सर्वांसाठी एक घ्यावी, असा सल्ला सुप्रिया सुळे यांना प्रवीण दरेकर यांनी दिला. पोलीस या सगळ्यांची चौकशी करून कारवाई करणार का, असा प्रश्न दरेकर यांनी उपस्थित केला.