कोल्हापूर : शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या रयतेच्या स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्याची राजधानी रायगड किल्ल्यास भेट देण्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी निश्चित केले आहे. मंगळवार दि. ७ डिसेंबर रोजी राष्ट्रपती रायगडाला भेट देवून छत्रपती शिवरायांना अभिवादन करणार आहेत.
रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राष्ट्रपतींना रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते. ते निमंत्रण स्वीकारून राष्ट्रपती कोविंद यांनी रायगड भेटीसाठीची ७ डिसेंबर तारीख निश्चित केली आहे. दरम्यान, राष्ट्रपतींच्या स्वागताची जय्यत तयारी रायगड जिल्हा प्रशासन तसेच रायगड विकास प्राधिकरणाच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे. यासाठी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे सहकार्य लाभत आहे.
यापूर्वी शिवछत्रपतींच्या जन्म शताब्दी सोहळ्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी सन १९८० ला रायगडावर आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी सिंहासनाच्या जागेवर मेघडंबरी उभारण्याची सूचना केली होती. मेघडंबरीचे काम पूर्ण झाल्यानंतर सन १९८५ ला राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग रायगडावर आले होते. त्यांच्या हस्ते मेघडंबरीचे अनावरण करण्यात आले होते.
या ऐतिहासिक घटनेच्या सुमारे ३५ वर्षानंतर विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद रायगडावर येणार आहेत. देशाचे सर्वोच्च नेतृत्त्व किल्ले रायगडाला भेट देणार असल्याने याची मोठी उत्सुकता तमाम शिवभक्त-इतिहासप्रेमींना लागून राहिली आहे.
https://www.youtube.com/watch?v=VVnoT-1TjY8