Presidential Election 2022 : काँग्रेस-राष्ट्रवादीची मते फुटणार; आशिष शेलार यांचे सूचक वक्तव्य

नवी दिल्ली – देशाच्या 16 व्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक आज होणार आहे. संसद भवन आणि राज्यांच्या विधान भवनांमध्ये सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत यासाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी द्रौपदी मुर्मू ( Draupadi Murmu ) या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या ( NDA ) उमेदवार आहेत; तर यशवंत सिन्हा ( Yashwant Sinha ) विरोधी पक्षांचे उमेदवार आहेत. या निवडणुकीची मतमोजणी 21 जुलै रोजी होणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद ( President Ram Nath Kovind ) यांचा कार्यकाळ येत्या 24 तारखेला संपत आहे.

दरम्यान राष्ट्रपती निवडणूकीच्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयोगानं नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक; अतिरिक्त सचिव अमित अग्रवाल यांनी काल मुंबईत विधान भवनातील सेंट्रल हॉल इथल्या मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी स्ट्राँग रुमलाही भेट दिली. त्याचबरोबर विधानभवनात झालेल्या बैठकीत सर्व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करुन त्यांनी निवडणूक तयारीची माहिती घेतली.

या निवडणुकीत महाराष्ट्रातून द्रौपदी मुर्मू यांना विक्रमी मते मिळणार असल्याचा विश्वास भाजप नेते आशिष शेलार ( Ashish Shelar) यांनी व्यक्त केला. पक्षमर्यादा झिडकारुन आज द्रोपदी मुर्मु यांच्या समर्थनात मतदान होईल असे सूचक वक्तव्य ही त्यांनी केले आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीची मते फुटणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आशिष शेलार यांनी सांगितले की, आम्हाला महाविकास आघाडीचे अस्तित्व दिसत नाही. महाराष्ट्रातून एनडीएच्या उमेदवारास मोठ्या संख्येनं मतदान होईल. तो आणखी एक राजकीय इतिहास ठरणार आहे. राज्यसभा, विधानसभा निवडणूकीत काय झालं ते राज्याने पाहिलं आहे. पक्षमर्यादा झिडकारुन आज द्रोपदी मुर्मु यांच्या समर्थनात मतदान होईल असे सूचक वक्तव्य शेलार यांनी केले.